पुणे : पुण्याला ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. इतिहासातील अनेक घटना पुण्यात घडल्याने पुण्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय. त्यामुळेच इथं अनेक जुनी मंदिरंही सापडतात. या पुराण काळातील मंदिराना भेट देण्यासाठी देशभरातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. पण यातील काही मंदिरांना फार चित्र-विचित्र नावे देण्यात आले आहेत. तत्कालिन परिस्थतीनुसार, तिथं घडलेल्या युद्धांनुसार येथील मंदिरांना अशी नावे देण्यात आली आहे. भिकारदास मारूती, मोदी मारूती, खुनी मुरलीधर अशी नावे ऐकून सुरुवातीला सगळ्यांनाच आश्चर्यच वाटतं. पण त्यामागे इतिहास आहे. पुण्यात ज्यावेळी पेशवाई होती, त्यावेळी अनेक लहान-मोठी मंदिरे स्थापन होत गेली. मारुती, गणपती, श्रीकृष्ण आणि विठ्ठलाची अधिक मंदिरे तयार झाली. ही मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. पण प्रत्येक मंदिराला गणपती मंदिर किंवा विठ्ठलाचं मंदिर असं नाव देणं शक्य नव्हतं. म्हणून आजूबाजूच्या वास्तुंनुसार, त्याकाळी घडलेल्या परिस्थितीनुसार मंदिरांना नावे देण्यात आली आहेत. अशाच काही मंदिरांविषयी आज आपण पाहुया.
बटाट्या मारूती
शनिवार वाड्यासमोर बटाट्या मारूतीचं मंदिर आहे. या मारूतीला बटाट्या मारूती का म्हणतात माहितेय? कारण शनिवार वाड्याच्या आजूबाजूला कांदे-बटाट्याचं मोठं मार्केट आहे. म्हणूनच मंदिरालाही बटाट्या मारूती असं नाव पडलंय.
मोदी गणपती
नारायण पेठेतल्या लोखंडे तालिम रस्त्यावर मोदी गणपतीचं मंदिर आहे. असं म्हणतात की गणपतीची ही मूर्ती खुश्रूशेठ मोदी यांच्या बागेमध्ये सापडली होती. म्हणूनच या गणपतीला मोदी गणपती असं म्हटलं जातं.
पासोड्या विठ्ठल
बुधवार पेठेत पासोड्या विठ्ठल मंदिर आहे. बुधवार पेठेत ब्लँकेट, घोंगडी मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. यालाच पासोड्या असं म्हणतात. म्हणूनच या परिसराची ओळख या विठ्ठलाला मिळाली आणि मंदिराला नाव पडलं पासोड्या विठ्ठल मंदिर.
भांग्या मारूती
शनिवार वाड्याच्या रामेश्वर चौकात भांग्या मारूतीचं देऊळ आहे. असं म्हणतात की या मंदिराच्या परिसरात भांग विकला जायचा. म्हणूनच या मंदिरातील मारूतीला भांग्या मारूती असं नाव देण्यात आलं.
आणखी वाचा - पुण्यातल्या या पेठा बनल्या आहेत तिथली ओळख
खुन्या मुरलीधर
खुन्या मुरलीधर या मंदिराच्या नावाबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. सदाशिव पेठेत हे मंदिर आहे. असं म्हणतात की 1717 रोजी सदाशिव रघूनाथ उर्फ दादा गर्दे यांनी बांधलं आहे. एकदा ब्रिटिश अधिकारी त्यांचे सैन्य घेऊन त्या मंदिरात गेले होते. तेव्हा गर्देंचे काही सैन्य ब्रिटिशांच्या सैनिकांशी भिडले. त्यावेळी जवळपास 50 ते 100 सैनिकांच्या मृत्यू झाला होता. तेव्हापासून या मंदिराला खून्या मुरलीधर असं म्हणतात. तर दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की, चाफेकर बंधू यांनी एका ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्यानंतर चाफेकर बंधू यांच्याच एका सहकार्याने ही माहिती ब्रिटीशांना सांगितली. विश्वासघात केल्याचा राग मनात धरून चाफेकर यांनी त्या सहकाऱ्याचीही हत्या केली. त्यानंतर ब्रिटीशांनी चाफेकर यांना पकडून त्यांना फासावर लटकवलं. त्यामुळे या मंदिराला खुन्या मुरलीधर असं म्हणतात. पण या दुसऱ्या माहितीबद्दल कोणताही पुरावा नसल्याचंही काहीजण सांगतात. त्यामुळे ती कितपत खरी आहे, हे मात्र माहीत नाही.
डुल्या मारुती
गणेश पेठेतल्या लक्ष्मीरोडवर असलेल्या डुल्या मारुतीलाही असाच रंजक इतिहास आहे. 350 वर्षांपूर्वी हे मंदिर स्वामी समर्थांनी बांधलं असं म्हटलं जातं. पानिपतचे जेव्हा तिसरे युद्ध सुरू होते तेव्हा मराठे बांधव अहमद शाह अब्दाली यांच्याशी युद्ध करत होते. पुणेकर या युद्धात असल्याने सरदार सदाशिव पेशवे यांना फार यातना झाल्या. असं म्हटलं जातं की हे युद्ध इतकं भयंकर होतं की या मंदिरातील मारुतीलाही युद्धाच्या यातना पोहोचल्या. म्हणूनच याला दुळ्या मारुती असं म्हटलं जातं.
आणखी वाचा - पुण्यातील ही ठिकाणं ट्रेकींंगसाठी नक्की ट्राय करा
याव्यतिरिक्तही टिळक रोडच्या विरुद्ध असेलला हाथी गणपती, सदाशिव पेठेतला चिमन्या मारूती, भिकारदास मारूती, नारायण पेठेतला पत्र्या मारूती, शनिवार चौकातला जिलब्या मारुती अशी नावे असलेलेही मंदिरे तुम्हाला पुण्यात सापडतील. प्रत्येक मंदिराच्या नावामागे इतिहास असला तरीही आजच्या पिढीला हा इतिहास सांगता येत नसल्याने या मंदिराची ओळख पुसू लागली आहे. सध्या आकर्षक मॉल, हॉटेल्स, थिएटर, रेस्टॉरंट्स तयार झाल्याने या मंदिरांना कोणीही ओळखत नाही. मात्र कधीकाळी हिच मंदिरं रस्त्याची ओळख सांगण्यासाठी महत्त्वाची कामे करत होती.
आणखी वाचा - पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी