पुणे : राजकारण्यांकडे जेव्हा सकारात्मक अजेंडा नसतो, तेव्हा ‘कल्चरल’वर लक्ष केंद्रित केले जाते. नोव्हेंबरला नाट्यगृह सुरू करणार, असे शासनाकडून सांगितले जात आहे. पण दोन महिन्यांत कोरोना जाईल असे वाटते का? असा सवाल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी उपस्थित केला. आपले आरोग्य ही आपली पण जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी नाही; पण सरकारचा मोठा हस्तक्षेप झाला आहे. कोरोना आरोग्याशी संबंधित समस्या असली तरी निसर्गाने मानवजातीकडे पाठविलेला संवाददाताच्या रूपात मी त्याकडे पाहतो. कोरोनासोबत जगण्याची सवय करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
संवाद पुणे आणि कृष्णकुमार गोयल फाउंडेशन यांच्यावतीने पुण्यातील नाट्यगृहांची माहिती असलेल्या ‘संवाद नाट्यगृहांशी’ या पुस्तिकेचे प्रकाशन आगाशे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे कृष्णकुमार गोयल, संवादचे सुनील महाजन आणि निकिता मोघे उपस्थित होते.
डॉ. आगाशे म्हणाले, नाट्यगृहे बंद असताना या पुस्तिकेचे प्रकाशन करावे लागणे हा विरोधाभास आहे. नाट्य कलाकार आणि संस्थांना माहिती देण्यासाठी अशा पुस्तिकेची आवश्यकता होती. या प्रकाशनाच्या निमित्ताने का होईना नाट्यगृहे आता खुली झाली पाहिजेत.
पुस्तकामुळे नाट्यगृहांचा दस्तावेज उपलब्ध झाला आहे. प्रत्येक वेळी सभागृहात प्रत्यक्ष जाऊन माहिती घेणे शक्य नसल्याने व्यक्ती आणि संस्थासाठी घरबसल्या माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, असे गोयल यांनी सांगितले.
-------------------------------------------
चौकट
मी पण सध्या पणत्या विकतोय....
कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बदलले. उपजीविकेसाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादने विकसित करून विकावी लागत आहेत. ही परिस्थिती असली तरी कोरोनाच्या काळात श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. कलाकारांना पाठिंबा म्हणून मी पण सध्या पणत्या विकण्याचे काम करीत आहे, अशी मिश्कील टिप्पणी करीत कोरोना काळात उपजीविकेसाठी पडद्यामागच्या कलाकारांनी तयार केलेल्या पणत्यांचे प्रात्यक्षिक डॉ. आगाशे यांनी सादर केले.
-------------------------------- -