लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीपीपी़द्वारे केवळ खराडी भागातील रस्तेच विकसित करण्यासाठी विकसक पुढे येत आहेत का, इतर भागातील रस्ते विकसित करण्यासाठी विकासक का पुढे येत नाहीत याची कारणमीमांसा काय आहे, असे प्रश्न स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थित केले आहेत. सत्ताधारी भाजपला केवळ खराडी भागाचाच विकास करायचा आहे का याचा खुलासा करावा, असे आवाहन केले आहे़
याबाबत तांबे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहिले आहे. या प्रस्तावात नमूद केलेले दोन्हीही पूल खासगी विकसकांनी त्यांच्या खर्चाद्वारे विकसित करण्याची तयारी पीएमआरडीएला दाखविली होती. असे असताना आपण हे पूल करण्यासाठी आग्रही का आहात़, असे विचारत, यामध्ये महापालिका प्रशासनाच्या हेतुबद्दल शंका उपस्थित होत असून, सर्वसामान्य पुणेकरांमध्ये याबाबत अविश्वास निर्माण होत असल्याचे सांगितले आहे़
या रस्त्यांचा विकास झाल्यानंतर खराडी भागातील विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, याबाबत महापालिका प्रशासनाने आपले लेखी म्हणणे मांडणे आवश्यक आहे. महापालिका एकीकडे या रस्ते व पुलांसाठी ६०० कोटी रुपये खर्च करणार आहे. एका ठराविक भागांमध्ये सुमारे सहाशे कोटी रुपये जर महापालिका खर्च करणार असेल तर, इतर भागातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असून याची उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक असल्याचे तांबे यांनी सांगितले आहे़