पुणे : धावत्या रेल्वेत रात्री - अपरात्री आपल्या घरापासून हजारो कोस दूर असताना अचानकपणे काही तरी घडतं. कोणाच्या तरी बाळाला ताप येतो, तर कोणाच्या तरी वडिलांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागतात, काहींना हाता- पायाला गंभीर जखमा होतात. अशा वेळी क्षणाचादेखील विलंब न लावता रेल्वे स्थानकांवर डॉक्टर उपलब्ध होतात आणि लगेच उपचारास सुरुवात देखील होते. रेल्वेने सुरू केलेल्या डॉक्टर कॉल सुविधेला पुण्यात चांगला प्रतिसाद लाभत आहे. पुणे स्थानकावर रोज याअंतर्गतच जवळपास १० ते १५ प्रवाशांवर नि:शुल्कपणे उपचार केले जात आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरून रोज किमान जवळपास २०० गाड्या धावतात, तर दिवसभरात लाख ते सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. यात अनेकदा प्रवासात प्रवाशांना प्रकृतीचा त्रास उद्भवतो. त्यावेळी उपचार मिळणे गरजेचे असते. यासाठी रेल्वे प्रशासनाने नि:शुल्क अशी वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. याचा अनेक प्रवाशांना फायदा होत आहे. मुलांना ताप येण्यापासून गाडीतच गर्भवती महिलेची प्रसूती करण्याचे काम येथील डॉक्टर करतात. प्रवाशाला जर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असेल, तर तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले जाते. तशी आवश्यकता नसल्यास प्रवाशांना एक दिवसाचे औषध देऊन पुढच्या प्रवासास पाठविले जाते. रेल्वेची डॉक्टर कॉलची सुविधा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्याला आता पुणे स्थानकावर चांगला प्रतिसाद लाभत आहे. एकट्या पुणे स्थानकावर २४ तासात १० ते १५ प्रवासी याचा लाभ घेत आहेत.
कोणाचं डोकं दुखतंय, जोड वैद्यकीय उपचाराची गरज लागली तर काय कराल
रेल्वे प्रवासात जर कुणाला वैद्यकीय उपचाराची गरज लागली, तर सर्वप्रथम प्रवाशांनी गाडीतील तिकीट पर्यवेक्षक यांना सांगावे. संबंधित प्रवाशास काय त्रास होत आहे, त्याची माहिती द्यावी. तिकीट पर्यवेक्षक त्या माहितीच्या आधारे रेल्वे नियंत्रण कक्षाला सांगेल. यात प्रवाशाला होणार त्रास ते प्रवाशांचे बर्थ क्रमांक आदींचा समावेश असेल. ज्या स्थानकावरून गाडी धावत आहे. त्याच्या पुढच्या स्थानकांवर रेल्वेचे डॉक्टर रुग्णवाहिकासह दाखल होतात. संबंधित रुग्णांच्या सीटवर जाऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. जोपर्यंत डॉक्टर होकार देत नाहीत, तोपर्यंत गाडी फलाटावर थांबून असते. डॉक्टर यावेळी गरजेप्रमाणे औषधे देखील देतात. त्या नंतरच गाडी मार्गस्थ होते.
प्रवाशांना रेल्वेत जर वैद्यकीय मदत लागली तर त्यांना ती तात्काळ उपलब्ध केली जाते. यासाठी आमची स्वतंत्र यंत्रणा काम करते. पुणे स्थानकांवर डॉक्टर कॉल सुविधेला चांगला प्रतिसाद लागतो. रोज किमान १० ते १५ प्रवाशांवर वैद्यकीय मदत दिली जात असल्याचे पुणे स्टेशन डायरेक्टर सुरेश चंद्र जैन यांनी सांगितले.
आम्ही २४ तास रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असतो. गर्भवती महिलांपासून ते हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. यासह गाडीत लोखंडी पत्रा लागून फाटलेले, मार लागलेल्या प्रवाशावर देखील तात्काळ उपचार केले आहे असे पुणे रेल्वे स्थानकाच्या डॉ. माया रोकडे म्हणाल्या आहेत.