हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी काच फोडून केली डॉकटर व नर्सला धक्काबुक्की ; स्थलांतर दरम्यान एकाचा मृत्यू.
वाघोली : कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने वाघोली (ता:हवेली) येथील मोरया हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांना सोमवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. रुग्णाच्या स्थलांतराला विरोध करून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी काच फोडून स्टाफला धक्काबुक्की केली. दरम्यान एका गंभीर रुग्णाचा स्थलांतर दरम्यान मृत्यू झाला. याबाबत सायंकाळ पर्यंत पोलिसात तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गालगत वाघोली-उबाळेनगर येथे असणाऱ्या मोरया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा साठा रविवारी रात्री कमी पडू लागला होता. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कल्पना देऊन अतिदक्षता विभागातील रुग्णांचे इतर हॉस्पिटलमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनानेच रुग्णांच्या स्थलांतराची सोय करण्यास मदत केली. दरम्यान स्थलांतरासाठी एका रुग्णाच्या नातेवाईकांनी विरोध दर्शविला व हॉस्पिटलची काच फोडून डॉक्टर व नर्सला शिवीगाळ व धक्काबुक्की केली.त्यामुळे पोलीस बंदोबस्तात व्हेनटीलेटर वरील एक व अतिदक्षता विभागातील ७ रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले. स्थलांतर करीत असताना हरिदास साहरुख (रा. मांजरी, वय ३५) या गंभीर रुग्णाचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. स्थलांतर दरम्यान हॉस्पिटलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोरया हॉस्पिटलमध्ये सध्या ३० कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. मृत साहरुख या रुग्णाची परिस्थिती पूर्वीच गंभीर असल्यामुळे उच्च उपचारासाठी स्थलांतरीत करण्यास हॉस्पिटलने सुचविले होते मात्र नातेवाईकांनी नकार दिला होता असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला असून लाईनचे काम पूर्ण झाले असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. साहरुख यांच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही.
फोटो- मोरया हाँस्पिटल