पुणे : विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकाला अचानक त्रास होऊ लागला. हृदयाचे ठोके कमी होऊ लागले, त्यामुळे जवळच असलेल्या विघ्नहर्ता न्यासाच्या डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीचे उपचार करून ताराचंद रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. विसर्जन मिरवणुकीत पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने गणेशभक्तांना अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. त्याचा ३४७ जणांनी लाभ घेतला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गाड्याला बैल पुरविणाऱ्यांपैकी एकाची तीन महिन्यांपूर्वी ॲन्जिओप्लास्टी झाली होती. रात्री काम करताना त्यांना अचानक घाम येऊ लागला. हृदयाचे ठोकेही कमी होऊ लागले. ते तातडीने विघ्नहर्ता न्यासाच्या रुग्णवाहिकेत गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने कार्डियाक उपचार दिले. त्यानंतर त्यांना लगेच ताराचंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करून प्राण वाचविण्यात यश आल्याचे डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.
विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांच्यासह डॉ. नंदकुमार बोरसे, डॉ. नितीन बोरा, डॉ. कुणाल कामठे, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. प्रीती विक्टर, डॉ. कैवल्य सूर्यवंशी, सदाशिव कुंदेन, जयशंकर माने, अशोक दोरूगडे, दिनेश मुळे, जयवंत जानुगडे यांनी या माेहिमेत सहभाग घेतला. १३० स्वयंसेवक, डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय मदतनीस, रुग्णवाहिका तसेच शेट ताराचंद रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन, कात्रजकर ॲम्बुलन्स, माय माऊली वृद्धाश्रम यांचे सहाय्य झाले.
या समस्यांचा करावा लागला सामना
गर्दी, ऊन आणि अति घाम आल्याने चक्कर येणे, अति आवाजामुळे लहान मुलांचे कान दुखणे, पडल्यामुळे झालेल्या दुखापती, रक्तदाब वाढल्यामुळे चक्कर येणे, शुगर कमी झाल्यामुळे चक्कर येणे अशी कारण प्रामुख्याने आढळून आली.