लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन जिमखान्यावरील प्रभात रोडवरील एका घरामध्ये ज्येष्ठ डॉक्टर मृतावस्थेत आढळून आले असून, उपचारादरम्यान त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे.
डॉ. सुबीर सुधीर रॉय (वय ६८) आणि जितिका सुधीर रॉय (वय ६५, रा. श्वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, डॉ. सुबीर रॉय हे नामवंत नेत्रतज्ज्ञ होते. त्यांचे येरवडा व विश्रांतवाडी येथे क्लनिक आहे. डॉ. रॉय, त्यांची बहीण जितिका व भाऊ संजय सुधीर रॉय (वय ६२) हे तिघे प्रभात रोडवर एकाच घरात रहातात. जितिका व संजय यांची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यांचे एक नातेवाईक गेल्या २ - ३ दिवसांपासून डॉक्टरांशी संपर्क साधत होते. परंतु, डॉक्टरांचा फोन बंद येत होता. त्यामुळे ते स्वत: शुक्रवारी त्यांच्या प्रभात रोडवरील घरी गेले. तेव्हा त्यांना जितिका हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. संजय हा घरामध्येच बसून होता. डॉ. रॉय यांची खोली बंद होती. खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अग्निशामन दलाच्या मदतीने डॉक्टरांच्या खोलीचा दरवाजा उघडला. आत स्वच्छतागृहात डॉक्टर मृतावस्थेत आढळून आले. जितिका यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉक्टरांच्या मृतदेहाच्या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांनी सांगितले की, डॉ. रॉय हे प्रकृतीने मजूबत होते. ते गेली ३० वर्षे आपल्या दुचाकीवरुन विश्रांतवाडी, येरवडा येथील क्लिनिकमध्ये जात असत. गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसात ते घरी येताना भिजले होते. त्यामुळे त्यांना सर्दी, ताप झाला होता. त्यानंतर ते २ -३ दिवस क्लिनीकला गेले होते. परंतु, गेल्या २-३ दिवसांपासून त्यांचा फोन लागत नव्हता. तसेच जर ते आजारी असतील तर त्यांचे दोन्ही भाऊ-बहीण त्यांची काळजी घेऊ शकले नसते. म्हणून शुक्रवारी आपण येऊन पाहिले तर ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या बहिणीला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.