लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह व शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या सुजित जगताप या डॉक्टराने या घटनेपूर्वी ८ दिवस अगोदर अशाप्रकारे स्पाय कॅमेरा लावल्याचे उघडकीस आले आहे.
डॉ. सुजित आबाजीराव जगताप (वय ४२, रा. सिंहगड रोड) असे या डॉक्टरचे नाव आहे. सुजित जगताप हा मेंदूविकारतज्ज्ञ आहे. तो तेथील महाविद्यालयात लेक्चर घेण्यासाठी नेहमी जातो. त्यावरून त्याची तेथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांशी चांगली ओळख झाली होती. विद्यार्थिनी आणि प्राध्यापक या नात्याने त्याने त्यांच्याशी बोलताना नकळत त्यांच्या रूमची चावीचे ठसे घेतले होते. त्याद्वारे त्याने त्यांच्या रूमची डुप्लिकेट चावी तयार करून घेतली होती. त्यानंतर त्याने ॲमेझॉनवरून कॅमेरा असलेले बल्ब खरेदी केले. त्याचे सेटिंग कसे असते, याचे प्रात्याक्षिक त्याने स्वत:च्या घरी केले होते. त्यानंतर घटनेच्या ८ दिवसांपूर्वी त्याने महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असल्याचे पाहून बनावट चावीद्वारे रूम उघडून त्यांच्या स्नानगृह व बेडरूममध्ये हे कॅमेरा असलेले बल्ब लावले होते. त्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे त्यांच्या रूममध्ये गेला होता. त्याने ते बल्ब काढून घेतले. त्यानंतर घरी येऊन ते पाहिले. मात्र, त्यात रेकॉर्डिंग झाले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ६ जुलैला पुन्हा दुपारी त्यांच्या रूममध्ये जाऊन हे बल्ब लावले. मात्र, यावेळी या महिला डॉक्टरांच्या हा प्रकार वेळीच लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
चौकशीत कृत्य उघडकीस
भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार नव्याने समोर आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले की, सुजित जगताप याने ओळखीतून बनावट चावी तयार करून घेतली होती. त्याद्वारे तो त्यांच्या नकळत रूममध्ये शिरला. हे घृणास्पद कृत्य करण्यामागे काय उद्देश होता, याबाबत तो अजूनही काहीही सांगत नाही. यातील स्पाय कॅमेरा व अन्य साहित्य तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.