खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण व तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे ह्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये ठाण मांडून बसले असून, तालुक्यातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. खेड तालुक्यात दोन दिवसापासून ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली आहे. इकडून तिकडून ऑक्सिजन सिलिंडर आणून त्यांनी कशीबशी व्यवस्था केली. तर अनेकांनी रुग्ण हलविण्यास नातेवाईकांना सांगितले. मात्र, रुग्णांना शहरांमध्येही बेड मिळत नसल्याने गंभीर परिस्थितीतून लोक जात होते. वाकी या गावातील एक रुग्ण तर ऑक्सिजन सिलिंडरसह शहरामध्ये ऑक्सिजन बेड शोधत होता.
खेड मधील अपेक्स रुग्णालयाने तर सरळ ऑक्सिजन बनवण्याचे मशीन बसून घेतले. त्या मशीनसाठी लिक्विड ऑक्सिजन मिळाला पाहिजे, असे डॉ. विनायक गवळी म्हणाले. ऑक्सिजन तुटवड्याबद्दल अनेक सोशल मीडिया द्वारे पोस्ट समाज माध्यमांवर पडू लागल्या आहेत. खेड तालुक्यांमध्ये ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्या असताना खेड तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसेल, तर दुर्दैव आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण म्हणाले, " खेड तालुक्यातील ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रुग्णालयांनी नियोजन करून त्यांना आवश्यक असलेला दिवसभराचा साठा एकदम भरला पाहिजे. दर चार ते पाच तासांनी मागणी करत राहिले तर पुरवठादारांचीही मोठी धावपळ होणार आहे."
कच्चा माल मिळेना
चाकण येथील ऑक्सिजन वितरक यांनी सांगितले की," ऑक्सिजनची मागणी १०० पटीने वाढली आहे. दररोज १६ टन मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादने केले जात आहे. पूर्वी ६ टन उत्पादन केले जात होते. त्यामध्ये वाढ होवून १६ टनावर गेले आहे. तरी देखील रुग्णालयांना देण्यासाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे. ऑक्सिजनसाठी रुग्णालय व्यवस्थापन दिवसभर संपर्क साधत आहेत. काहीही करा, पण ऑक्सिजन द्या, अशी विनंती केली जात आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. काही ठिकाणीं काळाबाजार सुरु आहे. लहान सहान व्यवसायिकांनाही ऑक्सिजन निर्मितीचा परवाना दिला आहे. ते औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन विकत आहेत. याकडे यंत्रणांचे लक्ष नाही."