बारामती (पुणे): चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे ऑनलाईन प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एमबीबीएस डॉक्टरांना ‘युजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ दिला जाणार आहे. १ नोव्हेंबरपासून या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती बारामती उपप्रादेशिक परीवहन विभागाचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्वच काम ऑनलाइन पद्धतीने होते. वाहन परवाना काढण्यासाठी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने घरबसल्या लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप सुरु करण्यात आलेली नव्हती. आता १ नोव्हेंबरपासून ही सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एमबीबीएस डॉक्टरकडून युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे.
१६ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर बिना गियर दुचाकी तर १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती सुदृढ असेपर्यंत ऑनलाइन परवान्याची सुविधा आरटीओकडून देण्यात आली आहे. तर चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरने लायसन्स काढण्यासाठी अर्ज करणारा उमेदवार सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर चाळीशीनंतरच्या उमेदवाराला लायसन्स व लायसन्स नुतनीकरण करून दिले जाणार आहे. याच सोबत वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देखील ऑनलाइन आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
एमबीबीएस डिग्री, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे नोंदणी प्रमाणपत्र, क्लिनिकचे किमान चार फोटोग्राफ, ओळखपत्र (उदा. ईपीक, पॅन आधार, पासपोर्ट) इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अशा प्रत्येक एमबीबीएस पदवी धारण करणाऱ्या डॉक्टरांना स्वतंत्र युजर आयडी देण्यात येतील. इच्छुक एमबीबीएस डॉक्टरांनी सर्व मुळ कागदपत्रे तपासणीकरिता कार्यालयात सादर करावे. बारामती आणि इंदापुरच्या काही डॉक्टरांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र, दौंड येथील डॉक्टरांचा एकही अर्ज नोंदणीसाठी आलेला नाही. संबंधितांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी केले आहे.