डॉ. अरूणकुमार पाटील : प्रबळ इच्छा रोगाला पळवू शकेल
पुणे : रुग्णांवर उपचार करता करता डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणे आपण पाहत आहोत. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधील कार्डिअँक युनिट विभागात कार्यरत असलेले डॉ. अरुणकुमार पाटील यांनाही अशा संकटाचा सामना करावा लागला. गावाहून पुण्याला परत येत असताना औरंगाबादच्या दरम्यान बसमधील दोन प्रवाशांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. अशा वेळी डॉ. अरुणकुमार पाटील त्याच बसमधून प्रवास करत असल्याने त्यांनी दोन्ही रुग्णांना तपासले, औषधे दिली. त्यानंतर पुण्याला परत आल्यावर दोन-तीन दिवसांमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागले, अशक्तपणा जाणवू लागला. ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. पण ते यातून सहीसलामत बाहेर पडले.
ऑक्सिजनची पातळी खालावल्याने ते भारती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. दोन-तीन दिवसांनंतर त्यांची तब्येत खूपच खालावली आणि व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली. पुढील दहा दिवस अत्यंत कसोटीचे होते. डॉ. पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वच डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. फुफ्फुुसाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. डॉक्टर तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवर होते. दहाव्या दिवशी ते शुद्धीवर आले. मात्र आपल्याला व्हेंटिलेटर लावून किती दिवस झाले आहेत, याची त्यांना कल्पना नव्हती. मी एक-दोन दिवस व्हेंटिलेटरवर होतो का, असे त्यांनी डॉक्टरांना विचारले असता, तुम्ही संपूर्ण दहा दिवस इंक्युबेशनमध्ये होतात, हे सांगितले. डॉ. पाटील यांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. मात्र या काळात त्यांचे वजन तब्बल १५ किलोने कमी झाले होते, प्रचंड थकवा आला होता.
घरी आल्यानंतरही थकवा कायम होता. दोन पायऱ्या उतरल्या तरी दम लागत होता. कार्यक्षमता वाढावी या दृष्टीने डॉ. अरुणकुमार पाटील दर तासाला दहा मिनिटे चालण्याचा व्यायाम करत होते. असे करत करत हळूहळू त्यांनी आपली चालण्याची क्षमता वाढवली. पौष्टिक आहार, औषधोपचार, श्वासाचे व्यायाम, प्राणायाम या सर्वांचीही जोड होतीच; सुदैवाने घरातील इतर कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. कोरोना आजाराच्या रुपाने आपल्या समोर आला आहे आणि आपल्याला त्याच्याशी लढून जिंकायचं आहे, अशी प्रत्येकाच्या मनात प्रबळ इच्छा असेल तर या आजारातून नक्कीच बाहेर पडता येते, असा कानमंत्र डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.