पुणे : डॉक्टर आणि रुग्ण यांचे आपआपसातील नाते हे सेवा आणि विश्वास या धाग्यांनी पूर्वी गुंफलेले होते, परंतु त्याचे रुपांतर आता ग्राहक आणि विक्रेता या स्वरूपात झालेले आहे. हा डॉक्टर मला लुटणार या संशयाने रुग्ण डॉक्टरांकडे, तर हा रुग्ण मला कोर्टात खेचणार या संशयाने डॉक्टर रुग्णाकडे पाहत असतो. एकंदरीतच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील निकोप नाते लयास जाऊन हे नाते संशयाच्या भोवºयात अडकले असून ते गढूळ झाले असल्याची खंत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ अभिनते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश जावडेकर लिखित आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘डॉक्टर होणे एक आव्हान’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आगाशे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्लॅस्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नंदू लाड, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी, डॉ. सुषमा जावडेकर उपस्थित होते.मनुष्यप्राण्याच्या अतिजगण्याचा हव्यास या सेवेचे व्यवसायात रूपांतर होण्यास कारणीभूत आहे. बहिणाबाई जसे म्हणतात, दोन श्वासातींल अंतर म्हणजे जीवन हे सूत्र आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुष्य हे किती जगलो त्यापेक्षा ते किती खोलीने जगलो हे अधिक महत्त्वाचे आहे.डॉ. जावडेकर म्हणाले, नाडी वैद्यशास्त्र जाऊन आता विविध रिपोर्टस्वर आधारित रुग्ण तपासला जातो. अलीकडे डॉक्टर रुग्णाला तपासण्याऐवजी रिपोर्टच तपासत असतो. आरोग्यसेवा मिळण्यासाठी काही नवीन प्रयोग राबविण्याची आवश्यकता आहे. ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. आगाशे म्हणाले, नकळत डॉक्टरकीचे व्यवसायात रूपांतार झाले असून रुग्णसेवा देणाºया डॉक्टरांपेक्षा भांडवलदारांच्या हातात हा व्यवसाय स्थिरवला आहे. हे भांडवलदार व्यावसायिक तज्ज्ञ डॉक्टरांना नोकरीवर ठेवून रुग्णसेवा चालवण्यास भाग पाडत आहेत. या भांडवलदार व्यावसायिकांनी डॉक्टरीपेशा हायजॅकच केला आहे. रुग्णसेवा देताना डॉक्टरांनी दोन श्वासातील जे अंतर आहे ते अंतर सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करावेत.