दीनानाथ मंगेशकर रुग्णालय : ११.३० मिनिटांनी दिली पहिली लस
ठिकाण - दीनानाथ मंगेशकर रूग्णालय
वेळ११.३०
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वेळ सकाळची ११.३० ची...डॉक्टर, परिचारिका यांची लगबग...अतिदक्षता विभागात कार्यरत असलेले ३१ वर्षीय डॉ. नितीन उगले यांनी नावनोंदणी करत लसीकरण कक्षात प्रवेश केला...परिचारिकेने लस देताच टाळयांचा कडकडाट झाला...उत्साह, आनंद, कुतूहल अशा भावनांमधून सर्वांनीच जल्लोष केला...अर्धा तास निरिक्षण कक्षात थांबल्यानंतर डॉ. उगले पुन्हा कामावर रुजूही झाले. या निमित्ताने डॉक्टरांची कामाप्रती असलेली निष्ठा अनुभवायला मिळाली.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात महापालिका कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचारी यांची सकाळी ९ वाजल्यापासूनच लसीकरणाची तयारी सुरु होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण संपताच ११ वाजून ५ मिनिटांनी प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला फार्मसिस्ट विभागातील एका महिला आरोग्य कर्मचा-याला लस दिली जाणार होती. मात्र, आजूबाजूला जमलेली गर्दी, लगबग पाहून त्या काहीशा बावरल्या होत्या. त्यामुळे अतिदक्षता विभागातील डॉ. नितीन उगले यांना पहिली लस देण्यात आली. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुध्दे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डीकर उपस्थित होते. रुग्णालयातील डॉ. समीर जोग, डॉ. माधव भट, डॉ. राजन जोशी यांच्यासह बरेच कर्मचारी उपस्थित होते.
शरीराचे तापमान, पल्स रेट तपासल्यानंतर स्वागत कक्षावर ठेवलेल्या यादीमध्ये डॉ. उगले यांच्या नावावर खूण करण्यात आली आणि त्यांना लसीकरण कक्षात नेण्यात आले. लसीकरण कक्षातील परिचारिकांनी व्हायल उघडत इंजेक्शनच्या सहाय्याने ०.५ मिलीचा पहिला डोस डॉ. ुनितीन उगले यांना दिला. एक मोठा टप्पा पार पडल्याचा आनंद आणि दिलासा सर्वांच्याच चेह-यावर दिसत होता. टाळया वाजवून हा आनंद साजरा करण्यात आला. निरिक्षण कक्षामध्ये पुष्पगुच्छ देऊन डॉ. उगले यांचे अभिनंदन करण्यात आले. अर्धा तास प्रकृती स्थिर असल्याचे लक्षात आल्यावर ते अतिदक्षता विभागामध्ये ड्युटीसाठी रुजूही झाले.
----------------------
माझे डीएनबी मेडिसिनचे शिक्षण दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच पूर्ण झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मी कोव्हिड वॉर्डमध्ये ड्युटी केली. आता अतिदक्षता विभागाचे काम पाहत आहे. कोव्हिड वॉर्डमध्ये रुग्ण पाहत असताना आपल्यालाही संसर्ग होईल का, अशी भीती कायम मनात असायची. लसीकरणाबाबत मनात कायम उत्सुकता होती. उत्सुकता आज प्रत्यक्षात उतरली आहे. मला लस घेतल्यानंतर काहीही त्रास झालेला नाही. लसीकरणामुळे आपल्या शरीरात जास्त काळ टिकणा-या अँटिबॉडी तयार होतात. सामान्य नागरिकांनी लसीकरणाबाबत कोणतीही शंका मनात बाळगू नये. लस घेतल्यानंतरही शारीरिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरुच ठेवायला हवा.
- डॉ. नितीन उगले