पुणे : शहरातील ५५ वर्षीय व्यक्तीला हृदयाघातानंतर शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना अनेक ‘ब्लॉकेजेस’ आणि हृदयाचे ठोके असामान्य होण्याचा त्रास होता. त्यांच्यामध्ये आधुनिक रिमोट मॉनिटरिंग तंत्रज्ञान असलेली ब्ल्यूटूथ मॉनिटरिंग यंत्रणा प्रत्यारोपित करण्यात आली. हे तंत्रज्ञान स्मार्टफोन ॲपशी जोडले असता डॉक्टरांना दूरूनच त्यांच्या रुग्णांच्या हृदयाच्या आरोग्यावर चोवीस तास देखरेख ठेवण्यास मदत होते.
आयसीडी हे लहान इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहे. ते हृदयाच्या ठोक्यांमधील असामान्यता ओळखण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी छातीच्या वरील भागामध्ये प्रत्यारोपित केले जाते. हृदयाचे ठोके असामान्य असतील तर हृदयाघाताचा धोका संभवू शकतो, जेथे हृदयाचे पंपिंग कार्य अचानक थांबते. हृदयाच्या ठोक्यांमध्ये जीवनाला धोकादायक असे बदल जाणवताच डिवाईस इलेक्ट्रिक इम्पल्स निर्माण करते, ज्यामुळे हृदयाचे ठोके पूर्ववत करण्यामध्ये व परिणामत: जीवन वाचवण्यामध्ये मदत होऊ शकते. आयसीडी प्रत्यारोपित करण्यात आलेल्या व्यक्तीला हृदयाघात झाल्याचे समजतही नाही. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भेट देणे गरजेचे असेल तर त्यांच्या डॉक्टरांना आयसीडीमध्ये असलेल्या रिमोट मॉनिटरिंग तंत्रज्ञानामुळे रुग्णाची तपासणी व उपचार करण्याबाबत आधीच समजेल.
“आधुनिक उपकरण चालक नसलेल्या कारप्रमाणे आहे. यामध्ये हृदयाची स्थिती जाणून घेण्याची आणि स्वत:हून निर्णय घेण्याची क्षमता आहे. या तंत्रज्ञानामध्ये रुग्णांना सोबत ट्रान्समीटर ठेवण्याची गरज नाही. ते नेहमीच उपकरण आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून डॉक्टरांशी कनेक्टेड असतात. कार्डियक इम्प्लाण्टेबल इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा रुग्णांना खूप फायदा होतो,” असे रुग्णावर प्रत्यारोपण केलेले डॉ. एम. एस. हिरेमठ यांनी सांगितले.