पुणे : जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावत असताना दवाखान्यात मात्र डॉक्टरच उपलब्ध नसतात, ही समस्या आता सुटणार आहे. जिल्ह्यातील ९६ पैैकी ९३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत आधार संलग्नित बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आले असून, डॉक्टरांची हजेरी आता यावर घेतली जात आहे.गेल्या तीन-चार वर्षांत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. ९६ पैैकी २५ केंद्रांना राष्ट्रीय मानांकनाचा दर्जा मिळाला असून, कायापालट प्रकल्पांतर्गत सर्वच केंद्रांचा भौतिक तसेच आरोग्यसेवेचा दर्जा वाढला आहे, असे असले तरी ३० ते ४० गावांसाठी एक प्राथमिक केंद्र असून, दूरवरून लोक येथे येतात. मात्र, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मात्र कामकाजाच्या वेळेत उपलब्ध नसतात. विशेषत: महिला प्रसूतीच्या प्रसंगी मोठी अडचण निर्माण होते.राज्यातील ही समस्या पाहता शासनाने २३ मार्च रोजी आदेश काढून बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली प्रभावीपणे व सक्षमपणे राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. कार्यवाही न झाल्यास त्या विभागाच्या प्रमुखावरच जबाबदारी निश्चित करून, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले होते. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी बैठका घेऊन ही प्रणाली बसविण्याबाबत वारंवार सूचना केल्या. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी याला विरोध करीत ही प्रणाली बसविण्यास नकार दिला होता. त्यानंतर पवार यांनी १२ आॅगस्ट २०१६ रोजी पत्र पाठवून बायोमेट्रिक प्रणालीवर आधारित वेतन अदा करावे, अशी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे काही काळ वेतन रखडले होते. जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा विषय सर्वसाधारण सभेतही मांडला होता. यावेळी डॉ. पवार यांना सदस्यांनी जाब विचारला होता. मात्र, हा शासनाचा आदेश असून आपल्याच सर्वांच्या तक्रारींनुसार ही प्रणाली बसविण्याची सक्ती केल्याचे त्यांनी सांगितले होते.त्यानुसार आता जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ९३ केंद्रांत ही प्रणाली बसविण्यात आली आहे. तीन आरोग्य केंद्र दुर्गम भागात असून, तेथे आधारलिंक मिळत नसल्याने बाकी आहे, पुढील काळात तेथेही बसविण्यात येईल, असे डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.यामुळे रूग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे. (प्रतिनिधी) शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी कधी?हजेरी पुस्तकावर सही मात्र शिक्षक दिवसभर शाळेतच नाही, ही ग्रामस्थांची वारंवार तक्रार. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक करणार असे सांगितले होते. मात्र वर्ष संपत आले तरी याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. ही प्रणाली बसविण्यात आल्याने आता आमचे वैद्यकीय अधिकारी कोणत्या वेळेत आले व कधी गेले याची माहिती जागेवरबसल्या कळते. तसेच, ते मुख्यालयात आले तरी त्यांना पंच करणे बंधनकारक आहे. यामुळे कधीही येण्या-जाण्यावर बंधन आले आहे.- डॉॅ. भगवान पवार, आरोग्य अधिकारी
डॉक्टरांची बायोमेट्रिक हजेरी
By admin | Published: March 09, 2017 4:13 AM