पुणे : राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या दिवशीच वानवडीतील डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय २६) आणि डॉ. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय २८, दोघे रा. आजादनगर, वानवडी) असे या दाम्पत्याचे नाव आहे.
डॉ. शेंडकर यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. डॉ. निखिल शेंडकर यांचे यवत आणि पुण्यात क्लिनिक आहे. बुधवारी डॉ. निखिल हे यवत येथील क्लिनिकमध्ये होते. निखिल हे यवतहून पुण्यात येत असताना अंकिता यांनी त्यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांच्यात फोनवर भांडणे झाली. निखिल हे घरी आल्यावर अंकिता दरवाजा उघडत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा डॉ. अंकिता शेंडकर यांनी घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांनी रात्री आठ वाजता ही माहिती वानवडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी अंकिता यांना खाली उतरवून ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्यांचा भाऊ ओमकार दत्तात्रय तळेकर (रा. उरुळी कांचन) यांच्या ताब्यात दिला.
डॉ. निखिल शेंडकर हे आपल्या घरी गेले. त्यांनी घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली. वानवडी पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून तपास चालू आहे.