पुणे : “किमान गरजांसह जीवन जगता येते, ही शिकवण आपल्याला कोरोनाने दिली आहे. त्याचबरोबरीने आरोग्य किती महत्त्वाचे आहे याची जाणीवदेखील करून दिली. स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी रुग्णांना सेवा दिली. भविष्यात कोरोनासारखी महामारी पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे डॉक्टरांवर विश्वास ठेवलाच पाहिजे,” असे मत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
‘लोकमत’च्या व्यासपीठावर प्रफुल्ल कोठारी यांच्या डायग्नोपेन सेंटर प्रस्तुत आणि डॉ. अनुज गजभिये यांचे हिरल आर्मीस आर्थोपेडिक क्लिनिक यांच्या विशेष सहयोगाने सोमवारी (दि. १५) ‘हेल्थ हार्मनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोरोनाकाळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सध्याच्या परिस्थितीचा सामना कसा करावा, कुटुंबाचे आरोग्याचे बजेट कसे असावे यावर चर्चा करण्यात आली.
पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या बघून समाजात डॉक्टरांविषयी अनेक गैरसमज पसरविले गेले. डॉक्टर हा देखील समाजाचा घटक आहे याचा विसर पडून अनेकांनी डॉक्टरांना दोष दिला. हे योग्य नसून डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर अनेक गोष्टी सोप्या होतील, याकडे लक्ष वेधण्यात आले.
डॉक्टरांचा सल्ला
- लसीकरणावर विश्वास ठेवावा.
- प्रत्येकाने लस घ्यावी.
- हेल्थ इन्शुरन्स ही काळाची गरज.
- आरोग्याचे बजेट असले पाहिजे.
- वृद्धांना मानसिक आधार दिला पाहिजे.
- मानसिक स्थैर्य महत्त्वाचे.
- उपचारावर झालेला खर्च वाया जातो, ही मानसिकता बदलण्याची गरज
- सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
कोट
“कोरोनामुळे आता प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत आहे. रोगाचे निदान होण्यासाठी पूर्व तपासण्या आवश्यक असतात. त्यासाठी सर्वसामान्यांना कमीत कमी खर्चात तपासण्या करता याव्यात हे मुख्य उद्दिष्ट आहे. आरोग्य चांगले असेल तर सर्व काही सुरळीत चालते. यासाठी जनजागृतीची गरज आहे.”
- प्रफुल्ल कोठारी, प्रमुख, डायग्नोपेन सेंटर
चौकट
“प्रत्येकाला स्वतःचे जीवन आरोग्यमयी असावे असे वाटते. त्यासाठी रोग जडू नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. रोग जडले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेतली पाहिजे. आरोग्याला प्राधान्य देत बजेट ठरविणे ही काळाची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी पैसे खर्च केला पाहिजे.”
-डॉ. अनुज गजभिये, प्रमुख, हिरल आर्मीस आर्थोपेडिक क्लिनिक.