नारायणगाव:- नारायणगाव येथील एका डॉक्टरने रूग्णास उपचारासाठी आपल्या रूग्णालयात दाखल न केल्याने ६६ वर्षीय रूग्णाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली असून निवृत्त शिक्षक असलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही नारायणगाव मधील डाॅक्टरांनी उपचारासाठी दाखल न केल्याने ऑक्सिजन अभावी या निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. सध्या कोविडच्या पार्श्वभुमीवर नारायणगाव परिसरातील काही डाॅक्टर रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून घेत नसल्याने अनेक रूग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ह्दयविकाराचा झटका आला असताना उपचारासाठी दाखल न करणाऱ्या डाॅक्टरांविरूद्ध मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मुलाने जिल्हाधिकारी,आरोग्य विभाग व मेडिकल कौन्सिल यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित डाॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मांजरवाडी येथील शंकर सिताराम भालेकर (वय ६६) सध्या वास्तव्य नारायणगाव यांना दि.१ सप्टेंबर २०२० रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नारायणगाव खोडद रोड वर असलेल्या एका ज्येष्ठ डाॅक्टरकडे नेण्यात आले. परंतु डाॅक्टरने न तपासता हाॅस्पिटल मधील अन्य व्यक्तीने त्यांना गाडीतच तपासून दुसऱ्या डाॅक्टरकडे नेण्यास सांगितले. यावेळी रूग्णासमवेत असलेला त्यांचा मुलगा गणेश भालेकर यांनी रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत १५ ते २० मिनिटे विनंती केली. तरीदेखील त्यांना उपचारासाठी अँडमिट करण्यास नकार दिल्याने बराच वेळ निघून गेल्यामुळे शंकर भालेकर यांची प्रकृती चिंताजनक होवून त्यांचा मृत्यु झाला. त्या अगोदर दोन दिवसांपूर्वी अन्य एका डाॅक्टरने देखील भालेकर यांना उपचारासाठी दाखल न करून घेता केवळ गोळया, औषधे देवून अॅडमिट करण्यास नकार दिला. या दोन्ही डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भालेकर यांना आपला जीव गमवावा लागला. डाॅक्टरांनी वडिलांना उपचारासाठी दाखल न करून घेतल्याने या डाॅक्टरांच्या विरोधात जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग व मेडिकल कौन्सिल यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथील निवृत्त शिक्षक वसंतराव धानापुने यांचे दि.२३ ऑगस्टला निधन झाले. धानापुने यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेला होता. मात्र ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना नारायणगाव येथील खोडद रोड वरील याच ज्येष्ठ डाॅक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, त्यांनी उपचाराला नकार देवून रूग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. अशाचप्रकारे नारायणगाव शहरातील इतर काही डाॅक्टरांकडे धानापुने सर यांना त्यांच्या मुलीने नेले आणि प्राथमिक उपचार करून ऑक्सिजन लावावे आम्ही ऑक्सिजन असलेली अँम्ब्ल्युलस द्वारे त्यांना पुढे नेतो अशी विनवणी करूनही धानापुने सर यांना उपचारासाठी नकार मिळाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला.
देवाची उपमा दिलेले डाॅक्टर कोरोनाची लक्षणे नसलेल्या रूग्णांवर देखील उपचार करण्यास नकार देत असल्याने नारायणगाव परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून उपचारास नकार देणाऱ्या डाॅक्टरांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.