किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या राम नदी पुनरुज्जीवन चळवळीवर आधारीत 'उपेक्षित राम नदी' या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी पत्रकार भवन येथे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरूज्जीवन अभियानचे संयोजक वीरेंद्र चित्राव, डॉ. गुरुदास नूलकर, अनिल गायकवाड उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी सुमारे गेली २० वर्षे राम नदीचा विषय सातत्याने लावून धरला आहे. मात्र, संसाधने उपलब्ध नसल्याने त्यास पूर्णत्व येऊ शकले नाही. त्यामुळे पुणे महानगर पालिकेची संसाधने या विषयाशी जोडून या कामाला गती देण्यात येत आहे. मुळा, मुठा आणि राम नदीसाठी तयार केलेल्या कंपनीमध्ये या सामाजिक संस्थांच्या व्यक्तींना सहभागी करून घेण्यास देखील महानगर पालिकेने सकारात्मकता दर्शवली आहे. मात्र, अद्याप राम नदीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला नसून, तो तयार करण्याच्या कामात देखील या संस्थांच्या सदस्यांनी सक्रियपणे सहभागी होणे गरजेचे आहे. तसेच या कामाचे प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.
यावेळी वीरेंद्र चित्राव आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, ही दोन पुस्तके रामनदीवरील पहिलीच पुस्तके असून, रामनदीवरील हा पहिलाच अधिकृत दस्तऐवज आहे. हे अभियान राबविण्यामध्ये ५५ महाविद्यालये, २५ शाळा, किर्लोस्करच्या तीन कंपन्या आणि सुमारे १०० पर्यावरणतज्ज्ञ यांचा सहभाग आहे.
डॉ. गुरुदास नूलकर म्हणाले, राम नदी पुनरुज्जीवन अभियान नक्की काय आहे, नदीचा इतिहास आणि भूगोल कसा आहे, धोके आणि आव्हाने कोणती आहेत, अभियानाचे उद्दिष्ट आणि मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत, काम करु इच्छिणाऱ्यांसाठी ४० कलमी कार्यक्रम कसा आहे अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाद्वारे मिळणार आहेत.
यावेळी अनिल गायकवाड, जयप्रकाश पराडकर, शैलजा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.