पुणे : वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे आज अवयवदानामुळे गंभीर रुग्णावर अवयवाचे प्रत्याराेपण करून त्याचा जीव वाचू शकताे. असे असले तरी जनजागृतीचा अभाव, शासकीय अनास्था, रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधा आदींमुळे अवयवदानाचा टक्का अपेक्षित प्रमाणात नाही. परिणामी, पुणे विभागातील २,१४१ रुग्ण किडनी, यकृत, हृदय या अवयवांसाठी कित्येक वर्षांपासून वेटिंगवर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’मध्ये अवयवदानाबाबत मत व्यक्त केले. देशात २०१३ मध्ये ५ हजार अवयवदान झाले, तर २०२३ मध्ये ही संख्या १५ हजारांवर गेल्याचा दाखलाही त्यांनी दिला. अवयवांच्या गरजू रुग्णांची वाढती यादी पाहता अवयवदानाबाबत आणखी जनजागृती हाेणे व या चळवळीला बळ मिळणे गरजेचे आहे.
पुणे विभागीय अवयव प्रत्याराेपण समन्वय समितीमध्ये (झेडटीसीसी) पुणे, सातारा, सांगली, काेल्हापूर यांसह ८ जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील अवयवदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी तसेच त्यांना प्रतीक्षा यादीनुसार अवयव मिळवून देण्याचे कामदेखील ही समिती करते.
पुणे विभागातील चित्र
१५०० रुग्ण- किडनी
५७० रुग्ण- यकृत
७१ रुग्ण- हृदय
कसे हाेते अवयवदान?
अपघातासह काेणत्याही कारणाने मानवी मेंदू मृत पावतो त्याला वैद्यकीय भाषेत 'ब्रेन डेड' असे म्हणतात. हा रुग्ण शरीररूपी जिवंत असतो; मात्र तो पुन्हा कधीही बोलू किंवा चालू शकत नाही. त्यावेळी त्याचे चांगल्या स्थितीतील अवयव काढून गरजूंवर प्रत्याराेपण करण्यासाठी पाठवतात. त्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांची सहमती मिळणे गरजेचे असते.
पुणे विभागात गेल्या पाच वर्षांत झालेले अवयवदान
वर्ष--------- अवयवदान
2018 .......... 63
2019 .......... 63
2020 .......... 41
2021 .......... 44
2022.............46
एकूण - २५७
देशात सध्या ब्रेन डेड रुग्णांची अधिकृत नाेंद लाखाच्या आसपास हाेते. वास्तवात ही संख्या याच्या काही पट असण्याची शक्यता आहे. वर्षाला केवळ एक हजाराच्या आसपास अवयवदान हाेतात. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. सन १९८० मध्ये रक्तदान ज्या अवस्थेत हाेते, त्यावेळी नागरिकांच्या मनात अशीच भीती हाेती. आता बदल व्हायला हवा.