लाभार्थी शेतकऱ्यांची आर्त हाक : पिके लागली जळू; आंदोलनाचा इशारा
शेलपिंपळगाव : मांजरेवाडी (ता. शिरूर) हद्दीतील चासकमान कालव्याच्या पोटपाटाला पाणी सोडत नसल्याने “पाणी असूनही घसा कोरडाच” अशी परिस्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे. पाणी वितरीत करण्यासंदर्भात वारंवार पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घेतल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. शेतीची तहान लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने तात्काळ डाव्या कालव्यातून डीवाय दहाला पाणी सोडावे; अन्यथा आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
गेल्या दीड - दोन महिन्यांपासून चासकमान धरणातून डाव्या कालव्यामार्फत आवर्तन सोडण्यात आले आहे. उन्हाळी हंगामातील पिक सिंचनाच्या दृष्टीने हे आवर्तन अत्यंत फायदेशीर ठरत आहे. मात्र मांजरेवाडी हद्दीतून वाजेवाडी, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण गावांमध्ये पाणी वितरीत करण्यासाठी असलेल्या पोटकालव्याला पाणी न सोडल्यामुळे परिसरातील ऊस, बाजरी, मिरची, गवार, भेंडी, भुईमूग, फुलशेती पाण्याविना जळू लागली आहे.
उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाटबंधारे विभागाने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस राजेश म्हस्के, माजी चेअरमन पंकज हरगुडे, कचरू वाजे, संपत काटकर, संदीप साबळे, अशोक साबळे, अशोक काटकर, संतोष शेटे, शिवाजी म्हस्के, नवनाथ शेटे, प्रवीण शेटे, भरत काटकर, संजय म्हस्के, सागर शेटे, संभाजी नाणेकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
हक्कांसाठी आंदोलने का ?
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने आमच्या शेकडो एकर जमीन संपादित केल्या आहेत. त्यामुळे चासकमान धरणातील पाणीआमच्या हक्काचे आहे. मात्र हक्काच्याच पाण्यासाठी आम्हाला वारंवार संघर्ष का? असा प्रश्न येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
साबळेवाडी परिसरातील ऊसपिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. (छाया : भानुदास पऱ्हाड)