लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने पहिली कुऱ्हाड हॉटेल उद्योगावर पडली आहे. रात्री ऐन गर्दी व्हायच्या वेळेसच बंदचा निर्बंध लागू झाल्याने त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार आहे.
कोरोना संसर्गापासून काळजी म्हणून सर्व हॉटेल रात्री दहा वाजता बंद करण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणीही लगेच सुरू झाली आहे. रात्री दहानंतर हॉटेल सुरू असेल तर अनेकदा दंडात्मक कारवाईही केली जाते.
हॉटेलमध्ये रात्री जाण्याची वेळ रात्री नऊनंतरच असते. त्यातही आता उन्हाळा असल्याने बरेचजण कुटुंबासहित ‘हॉटेलिंग’चा बेत ठरवतात. त्यामुळे रात्री नऊनंतरच हॉटेलचा खरा व्यवसाय सुरू होतो. आता नियमानुसार त्यांना बरोबर याच वेळेत सक्तीने हॉटेल बंद करावे लागते आहे.
शहरातील जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता अशा मध्यभागातील अनेक ठिकाणी तसेच उपनगरात मिळून ३ हजारांपेक्षा जास्त लहानमोठी हॉटेल आहेत. तिथे रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. सकाळी ११ ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी भोजनसेवा सुरू असते.
आता त्यांच्या वेळेवरच गदा आली आहे. हॉटेलचा खर्च लक्षात घेता आधीच पन्नास टक्के उपस्थितीने त्यांचे एरवीचे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. आता रात्री दहानंतर बंद या नियमाने आता ते अधिक खाली जाऊ लागले आहे. कोरोनासंबधीची सरकारची हॉटेल व्यवसायासंबधीची एकही नियमावली तर्कसंगत नाही. रात्री दहानंतर हॉटेलांमध्ये कोरोना येऊन बसतो काय? असा हॉटेल चालकांचा सरकारला सवाल आहे.
चौकट
निर्णयच चुकीचा
“बंद ठेवा म्हणाले बंद ठेवले. नंतर फक्त पार्सल सुरू करा म्हटले ते केले. आता पन्नास टक्के उपस्थितीत चालवा म्हटले तर तेही केले. आता पुन्हा रात्री दहाला बंद करा सांगतात. अशाने भाजीवाले, धान्यविक्री करणारे अशा अनेक समाजघटकांना रोजगार देणारा हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद पडण्याची शक्यता आहे.”
किशोर सरपोतदार-उपाध्यक्ष, महाराष्ट्र हॉटेल ओनर्स असोसिएशन
चौकट
कर का नाही कमी करत?
“हे असे निर्णय घेताना सरकार ‘आपण या उद्योगाचे काही करही कमी करू’ असा निर्णय का नाही घेत? रात्री दहा या गर्दीच्या वेळेत हॉटेल बंद करण्याचा निर्णय म्हणजे हॉटेल उद्योगावर टाच आणण्याचाच प्रकार आहे. यामुळे उत्पन्न कमी होणार, मग कामगारांचे पगार, बाकीचा खर्च कसा करायचा?”
-चिरायू फासे, हॉटेल व्यावसायिक, पौड रस्ता.