पुणे: सध्या शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीचा फटका पुणेकरांना बसत आहे. एखाद्या ठिकाणी कोंडी झाली की, बरेच जण हाॅर्न वाजवत असतात. खरं तर त्याने कोंडी सुटणार नसते. पण ध्वनिप्रदूषणाची समस्या मात्र वाढते. कारण तिथे अनेक वाहनांचा आवाज एकत्र आल्याने आवाजाची पातळी वाढते. हाॅर्न वाजवला की समोरील गाडी गायब होत असेल आणि मार्ग मोकळा होत असेल तर मग वाजवा, अशी प्रतिक्रियाही मिळाली.
ध्वनिप्रदूषणाची पातळी एरव्ही कुठेही मोजली जात नाही. तशी यंत्रणा नाही. सार्वजनिक ठिकाणी वाहनांचा हाॅर्न वाजविला जातो. त्याची पातळी सरकारने ठरवून दिलेली आहे. वाहनांच्या हॉर्नचा आवाज ११२ डेसिबलपर्यंत असतो. तो सरकारने ठरवून दिला आहे. तो आवाज ८० डेसिबलपर्यंत आणण्याचा विचार सरकारने केला हाेता. परंतु, अद्याप त्यावर काही निर्णय झाला नाही.
योग्य ठिकाणी योग्य वेळी करायला हवा
हाॅर्न वाहनाला असणे आवश्यक आहे. पण त्याचा वापर योग्य ठिकाणी योग्य वेळी करायला हवा. आता ई-वाहने आली आहेत. त्याला अजिबात आवाज नाही. समोरील व्यक्तीलाही मागून ते वाहन येत असल्याचे समजत नाही. म्हणून आता ई-वाहनांना कृत्रिम आवाज फसविण्याचा विचार सरकार करत आहे. कारण नागरिकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. - मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका
हॉर्न न वाजवता प्रवास करू शकतो
परवा माझ्या दुचाकीचा हॉर्न बंद पडला. मला सकाळी ऑफिसला निघताना ते लक्षात आले. कसा-बसा हडपसरवरून शिवाजीनगरला जायला निघालो, पण सकाळी असणारी वाहतूक कोंडी, त्यात मार्ग काढत वेळेत ऑफिसला पोचण्याची गडबड पाहता आज मला विना हॉर्न ऑफिसला जाता येईल का? याबद्दल जरा मनात भीती होती. पण आपण हॉर्न न वाजवता प्रवास करू शकतो हे अनुभवले, असे दुचाकीस्वार अनिकेत राठी यांनी सांगितले.
कशाला हॉर्न वाजवायचा?
परदेशात वाहनाचा परवाना काढताना हॉर्न वाजवला तर त्याला नापास करतात. पण आपल्याकडे मात्र सर्रास रस्त्यात विनाकारण हॉर्न वाजवला जातो. जर हॉर्न वाजवला आणि समोरील वाहन गायब होत असेल तर मग तुम्ही हॉर्न वाजवा ना! पण तसे घडायला हवे बरं! पण तसे काही होत नसते. त्यामुळे कशाला हॉर्न वाजवायचा? - हर्षद अभ्यंकर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट