पुणे : शाळेतील मुलांसमोर आपण काय बोलतो आहोत याचे साधे भानही नसणाऱ्या अभिनेते शरद पोंक्षे यांना देशाला दहशतवादाकडे न्यायचे आहे का असा प्रश्न काँग्रेसने सोमवारी केला. पोंक्षे यांनी ते ज्या विचारधारेचे प्रतिनिथित्व करतात त्या विचारधारेच्या लोकांनीच सावरकरांना एकेकाळी कसे वागवले याचा अभ्यास करावा असा सल्लाही यावेळी पोक्षेंना देण्यात आला.
पोंक्षे यांनी स्वातंत्ऱ्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या एका कार्यक्रमात बोलताना सावरकरांच्या विचारांची दहशत वाटायला हवी असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर पुण्यातील लहान मुलेही सावरकरांचे नाव नीट घेतात, दिल्लीतील एका ५२ वर्ष वयाच्या मुलाला मात्र त्यांचे नाव नीट घेता येत नाही अशी टीका नाव न घेता राहूल गांधी यांच्यावर केली होती. काँग्रेसच्या वतीने सोमवारी पोंक्षे यांच्यावर यासंदर्भात टीका करण्यात आली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, पोंक्षे अभिनेते आहेत, शाळेतील मुलांसमोर काय बोलावे हे त्यांना कळत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ यांनी सावरकरांना कधीही सन्मान, आदर दिला नाही. कायम त्यांच्या विरोधात राहिले. काँग्रेसचे व सावरकरांचे राजकीय मतभेद होते, मात्र स्वातंत्ऱ्यसैनिक म्हणून काँग्रेसने त्यांचा नेहमीच सन्मान केला. मुंबईतील सावरकर स्मारकाच काँग्रेसनेच निधी दिला. इंदिरा गांधी यांनी तर सावरकरांवर टपाल तिकीट काढले.
पोंक्षे यांच्या विधानाचा काँग्रेस निषेध करत असल्याचे अरविंद शिंदे यांनी सांगितले. राहूल गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य त्यांनी त्वरीत मागे घ्यावे, अन्यथा काँग्रेसलाही त्यांना तसेच उत्तर देता येते असा इशाराही शिंदे यांनी दिला. सचिन आडेकर यांनी प्रास्तविक केले. माजी नगरसेवक अजित दरेकर व अन्य काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.