पुणे: तुमचं श्वान काही खात नाहीये, सुस्तावलंय किंवा त्याला उलट्या किंवा अतिसाराचा त्रास होतोय. तर मग हा कदाचित ‘टिक फिव्हर’ असू शकतो ( tick fever ). लहान मुलांप्रमाणेच सध्या श्वान देखील ‘टिक फिव्हर’ने आजारी पडले असून, पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारांसाठी वेटिंग असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ‘श्वान’ पाळण्यास विशेष पसंती दिली जात आहे. लॉकडाऊन काळापासून श्वान खरेदीचे प्रमाण वाढल्याने आता गल्लोगली हातात दोरी घेऊन श्वान फिरायला नेणारे मालक दिसू लागले आहेत. ‘श्वान’ कुटुंबातीलच एक सदस्य असल्याने त्याची मुलाप्रमाणेच काळजी घेतली जात असून, त्याच्या आरोग्याकडेही जातीने लक्ष दिले जात आहे.
सध्या व्हायरल इंफेक्शनमुळे कुटुंबातील मुले जशी आजारी पडत आहेत. तसेच श्वान देखील ताप, सर्दी, उलट्यांनी ग्रस्त झाले आहेत. त्यामुळे श्वानांसाठीही पशुवैद्यकीय दवाखान्याचे उंबरठे चढण्याची वेळ मालकांवर आली आहे. प्राण्यांच्या शरीरावर ‘टिक’ सापडणे नवीन नाही. पण त्यांच्यापासून आपल्या पाळीव प्राण्याचे संरक्षण करणे आणि श्वानांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सर्वस्वी मालकांची जबाबदारी असते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास श्वानांच्या जीवावर देखील ते बेतू शकते. श्वानाला भूक लागत नसेल किंवा तो काहीसा उत्साही नसेल तर त्याच्या या हालचालींकडे दुर्लक्ष करु नका, तो ‘टिक फिव्हर’ देखील असू शकतो असे पशुवैद्यकांकडून सांगण्यात आले आहे.
आमचा रँम्बो नेहमी खूप उत्साही असतो. मात्र काही दिवसांपासून त्याच्यात वर्तणुकीत काहीसा बदल झाल्यासारखे जाणवले. तो त्याचे आवडते खाद्य खात नव्हता, कुणी आले तरी भूंकत नव्हता. त्याच्यात उठण्याची पण एनर्जी नव्हती. तेव्हा आम्ही त्याला पटकन पेट डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी रँम्बोची ब्लड टेस्ट केली आणि त्यातून त्याला टिक फिव्हर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले आणि गोळ्या लिहून दिल्या. आम्ही वेळीच घेऊन गेलो म्हणून चटकन उपचार करता आले
- आशिष पाटील, श्वान मालकश्वानांमध्ये टिक फिव्हरच्या केसेस वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या काळात डॉग्स हॉस्टेल्स वाढली आहेत, डॉग पार्क वाढले आहेत. मालक कुत्र्यांना फिरायला घेऊन जातात. अनेक कुत्री एकमेकांच्या संपर्कात आल्याने टिक श्वानांमध्ये ट्रान्सफर होतात आणि त्यातून इंफेक्शन वाढते. त्यामुळे ताप येतो, खात नाहीत, मागच्या पायातली ताकद कमी होते, ताप अधिक असल्याने धापा टाकतात ही लक्षणे दिसल्यानंतर मालक श्वानाला घेऊन येतो. त्याची ब्लड टेस्ट केल्यानंतर उपचार केले जातात
- डॉ. अमोद काळे, पशुवैद्यक