पुणे : पुणे जिल्ह्यातही मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांनी या वर्षी जवळपास १४ हजार नागरिकांना चावा घेतला आहे. अनेक गावांत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. शेतकरी शेताच्या रखवालदारीसाठी कुत्रा पाळतो. ग्रामीण भागात श्वान शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. भटक्या जनावरांना हुसकावण्यासाठी, तसेच शेळ्या-मेंढ्यांच्या संरक्षणासाठी मेंढपाळ प्रामुख्याने कुत्री पाळतात. मात्र, पाळीव कुत्र्यांबरोबरच मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. २०१७ ते मे २०१८ पर्यंत जिल्ह्यात या मोकाट कुत्र्यांनी जवळपास १४ हजार १२९ ग्रामस्थांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत.ग्रामीण भागात कुत्र्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाड्या-वस्त्यांतील नागरिक रात्री बाहेर पडल्यास दबा धरून बसलेली ही कुत्री त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. यात अनेक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत.चाकण येथे काही दिवसांपूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात १ बालकगंभीर जखमी झाले होते. अनेक शेळ्या-मेंढ्या, तसेच जंगली प्राण्यांचाही या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.२०१७मध्ये जवळपास २० हजार ४०० श्वानदंशांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे झाली आहे. सर्वाधिक घटना या हवेली तालुक्यात झाल्या आहेत. जवळपास ३ हजार ९४५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. जुन्नर तालुक्यात ३ हजार ५६२, दौंड तालुक्यात २ हजार ७७४ ग्रामस्थांना कुत्र्यांनी जखमी केले आहे. इंदापूर तालुक्यात २ हजार १४५ आणि मावळ येथे २ हजार ९७ ग्रामस्थ श्वानदंशाला बळी पडले आहेत. या वर्षी मे महिन्यापर्यंत तब्बल १४ हजार १२९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. याही वर्षी सर्वाधिक घटना या हवेली तालुक्यात घडल्या आहेत. जवळपास ३ हजार १७४ व्यक्ती कुत्र्यांच्या हल्ल्याला बळी पडले आहेत. जुन्नर येथे १ हजार ९४४, इंदापूर १ हजार ४०८, दौंड येथे १ हजार ४४६नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.दोन वर्षांच्या काळात श्वानदंशाच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांना श्वानदंशासाठी अँटी-रेबीजच्या लशी देण्यात आल्या आहेत. सर्व आरोग्य केंद्रांत या लशी पूरक प्रमाणात उपलब्ध आहेत.- डॉ. दिलीप मानेजिल्हा आरोग्याधिकारी
पुण्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; सहा महिन्यांत १४ हजार जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:30 AM