पुणे: शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, यावर योग्य उपाय-योजना करण्यासाठी महापालिकेच्या वतीने या कुत्र्यांना निबिर्जीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण करण्यासाठी प्रभागनिहाय मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता पर्यंत ५४४ कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, या कुत्र्यांच्या गळ्यात विविध रंगांचे पट्टे बांधण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्य नागरिकांचा त्रास देखील प्रचंड वाढला आहे. गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याची संख्या तर खूपच वाढली आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या नागरिकांना जीवमुठीत घेऊन या भटक्या कुत्र्यांपासून स्वत: ला वाचवावे लागते. याबाबत महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उडाल्यानंतर आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन केले आहे. याबाबत डॉ.साबणे म्हणाले, महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ब्ल्यू क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि त्यांना अँटी रेबिज लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत येणा-या प्रभागांमध्ये कारवाईसाठी प्रत्येकी दहा दिवसांचे नियोजन तयार करून तशी पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५४४ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना अँटी रेबिजची लस देण्यात आली आहे. २० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. -------------------भटक्या कुत्र्यांसाठी लवकरच संगोपन केंद्रशहरामध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. यामध्ये अनेक कुत्री अपघातात जखमी होतात. अनेक प्रकारचे आजार होतात अशा कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरच स्वतंत्र संगोपन केंद्र सुरु करण्यात येणार असून यासाठी जागा निश्चित करुन हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. - डॉ.अंजली साबणे, महापालिका आरोग्य अधिकारी
कुत्र्यांच्या गळ्यात लसीकरणाचा पट्टा : डॉ.अंजली साबणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 7:25 PM
गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या नागरिकांना जीवमुठीत घेऊन या भटक्या कुत्र्यांपासून स्वत: ला वाचवावे लागते.
ठळक मुद्देशहरामध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या, प्रभागनिहाय मोहीम राबविणारटीकेची झोड उडाल्यानंतर आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजन भटक्या कुत्र्यांसाठी लवकरच संगोपन केंद्र