नेहा सराफ
पुणे :आज जागतिक योग दिवस. संपूर्ण भारतसह जगभर योग पद्धतीचा गौरव सुरु असताना महाराष्ट्राचा एक तरुण मात्र त्याची कीर्ती पोचवण्यासाठी युरोपमध्ये काम करत आहेत. मुख्य म्हणजे आयुर्वेद आणि योग यांची सांगड घालताना धर्माच्या सीमाही त्याने पार केल्या आहेत. ही कौतुकास्पद कहाणी आहे डॉ निसार शेख यांची.
निसार हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी. त्यांचे वडील तिथे शिक्षक असून घरात पूर्णपणे स्वतंत्र वातावरण आहे. त्यांचे वडील तर ज्ञानेश्वरीवर प्रवचन देतात. आजही त्यांच्या घरी कुराण व्यतिरिक्त गीता, बायबल, चारही वेद, ज्ञानेश्वरी तितक्याच आपुलकीने आणि सन्मानाने ठेवली आहेत. अशा विचारसंपन्न घरात जन्मलेल्या निसार यांनी राहुरी येथे बी ए एम एसचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी इस्लामपूर येथे एम डी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक आणि इतरही काही ठिकाणी त्यांनी काही काळ काम केले. मात्र वैद्यकीय व्यवसाय करत असताना लागणारी कठोरता नसल्याने त्यांना अनेकदा मानसिक त्रास व्हायचे. अखेर त्या कामाला रामराम करत त्यांनी लोणावळा येथील कैवल्यधाम योगा इन्स्टीट्युट येथे या वर्षांचा डिप्लोमा केला आणि त्यांच्या आयुष्यातल्या बदलला सुरुवात झाली.
एकीकडे त्यांनी गावाकडे दवाखाना उघडावा अशी घरच्यांची इच्छा डावलून त्यांनी पुण्यातील कॅम्प भागात दवाखाना सुरु केला. मात्र दुसरीकडे योग आणि आयुर्वेदाच्या बाबत असणाऱ्या शंका, अंधश्रद्धा आणि गैरसमज यामुळे दवाखान्यात वर्षभर एकही रुग्ण आला नाही. पण अशा परिस्थितीतही न डगमगता त्यांनी भारताबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनाही कितपत प्रतिसाद मिळेल माहिती नव्हते पण त्यांनी हिंमत केली आणि आज युरोपमध्ये त्यांचे दोन क्लिनीक आहेत. बल्गेरियातील सोफिया आणि जर्मनीतील म्युनिक इथे त्यांचे क्लिनिक असून स्काईप किंवा इतर ऑनलाईन माध्यमातूनही ते रुग्णांना उपचार सुचवतात आणि योगाचे धडेही देतात. वर्षातील चार महिने ते भारताबाहेर काम करतात.
या सगळ्या प्रवासाबाबत ते म्हणतात की, 'भारतात आपल्याकडे आहे ते वाईट आणि युरोपमध्ये ते चांगलं असा गैरसमज आहे. मुळात योग आणि आयुर्वेदाकडे धर्माच्या पलीकडे जाऊन बघण्याची गरज आहे. आज युरोपची जीवनपद्धती भारतात वेगाने आत्मसात केली जात आहे. अशावेळी त्यांचे आजारही आपल्याकडे येणार आहेत. मात्र त्यांनी त्यावर योग उपचार घेण्यास सुरुवात केली पण आपण मात्र आपल्याच शास्त्राकडे दुर्लक्ष करत आहोत, हेच दुर्दैव आहे'.
निर्माण केली नवी वैदिक योग पद्धती
परदेशात पंचकर्म करणे शक्य नाही. पण जमेल तसे कानात तेल घालणे किंवा तेलाने अभ्यंग स्नान अशा काही गोष्टी रुग्णांना सांगितल्या जातात. पण त्यासोबत रुग्णाची शारीरिक, मानसिक स्थिती लक्षात घेऊन नवी वैदिक योग्य पद्धती डॉ शेख यांनी निर्माण केली असून तिला उत्तम प्रतीसाद मिळत आहे.
युरोप सरकारने केला गौरव
युरोपमध्ये रविवारी म्हणजेच १६ जूनला योग दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ शेख यांना विशेष वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते. तिथल्या सरकारनेही त्यांनी गौरव केला..