पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मद्यविक्रीमध्ये घट झाली आहे. देशी दारूच्या विक्रीत १५ टक्के, बीअरच्या विक्रीमध्ये ११ टक्के, तर विदेशी मद्य आणि वाईनच्या विक्रीत आठ टक्क्यांनी घट झाली असून, शहर व जिल्ह्यातील १ हजार ६१९ मद्यालये बाधित झाली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शहरांमधून जाणारे महामार्ग या आदेशामधून वगळण्यात आले आहेत. महामार्गांवर होणाऱ्या अपघाताला मद्यपान जबाबदार असून, महामार्गांवरील ५०० मीटरच्या आतील मद्यालये बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाची १ जानेवारी २०१७ पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्याचा फटका बसल्याने महसुलातही घट झाली होती. एप्रिल २०१६ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत १ कोटी २६ लाख ५२ हजार ४५१ लीटर देशी दारू विकली गेली होती. तर चालू वर्षात २१ लाख ८९ हजार ४५४ लीटरने विक्रीमध्ये घट झाली असून, १ कोटी ४८ लाख ४१ हजार ९०५ लीटर देशी दारूची विक्री झाली आहे.
बीअरच्या विक्रीमध्येही घट देशी बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी घटली आहे. बीअरच्या विक्रीमध्येही एप्रिल ते आॅक्टोबर २०१६ पेक्षा २०१७ मध्ये ११ टक्क्यांनी घट झाली आहे. चालू वर्षात स्ट्राँग आणि माईल्ड बीअरची २ कोटी २६ लाख २७ हजार ४६० लीटरची विक्री झाली आहे. ही विक्री २०१६ पेक्षा ३१ लाख ८३ हजार ९१९ लीटरने कमी आहे. तर वाईनच्या विक्रीत ८ टक्क्यांची घट झाली असून, गेल्या वर्षी ६ लाख ६ हजार ५६३ लीटरची विक्री झाली होती.