आदेश असताना शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा न्यायालयात पुरावे सादर करणार - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 12:55 PM2024-11-17T12:55:02+5:302024-11-17T12:56:57+5:30
तुम्ही जिकडे गेला आहात त्यांचा फोटो लावा, शरद पवारांचा फोटो लावायचा नाही, सोयीप्रमाणे त्यांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही
राजुरी (जुन्नर) : शरद पवारांना सोडून तिकडे जाणाऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं. अतिशय विनम्रपणे सांगते की, तुम्ही जिकडे गेला आहात त्यांचा फोटो लावा. शरद पवारांचा फोटो लावायचा नाही. सोयीप्रमाणे त्यांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही. न्यायालयाचे आदेश असतानाही शरद पवारांचा फोटो वापरल्याचे पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार अतुल बेनके यांना नाव न घेता दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचार दौऱ्यात राजुरी (ता.जुन्नर) येथे आयोजित सभेत सुप्रिया सुळे यांनी बेनके यांच्यावर टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कटेंगे तो बटेंगे अशा पद्धतीने हा देश चालणारा नाही, हा देश शाहू, फुले यांच्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा देश आहे. शरद पवार यांना या वयात काहीही नको आहे, ते कष्टकरी शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी लढत आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आल्यानंतर पाच वर्षांत महागाई स्थिर ठेवण्यात येईल, महिलांसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी ३ हजार रुपये देणार येणार. कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण सुरू असल्याने सत्यशील शेरकर आमदार झाल्यावर जुन्नर ते उस्मानाबादपर्यंतच्या सर्व आमदारांची एकत्र बैठक घेऊन पाण्याचे सामान वाटप करू व पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल. मतदारांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात जुन्नर तालुक्यातून शरद लेंडेसह जे उभे राहिले त्या सगळ्यांना शब्द देते, राज्यात आपली सत्ता आल्यानंतर मान आणि पहिलं सत्तेचं पद जुन्नर तालुक्याला दिले जाईल. हे रेकॉर्ड करून ठेवा, असे आश्वासन सुप्रिया सुळे जाहीर सभेत दिले. शिवसेना उपनेते बबन थोरात म्हणाले की, भाजप सरकारला शेतकऱ्यांशी काहीही घेणे देणे नाही, या सरकारने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायचे काम केले आहे. भाजप पक्षातील नेत्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडण्याचे काम केले आहे. अशा गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.
रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार
केंद्र शासनाच्या जीएमआरटी या अतिमहत्त्वाच्या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात रोजगार निर्मितीवर अतिशय मर्यादा येतात. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी शासनाकडून भरीव निधी आणून मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यात हिंजवडी आणि मगरपट्टा या आयटी पार्कच्या धर्तीवर खासगी आणि सरकारी गुंतवणूक आणून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. शेतीमाल प्रक्रिया करून परदेशी पाठविण्यासाठी आणे पठारावर कार्गो हब उभारणार असून आदिवासी भागातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी जलसाठे, धरणे आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार व तालुक्यात युवकांसाठी क्रीडा धोरण आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.