पुणे : अमिरेकीचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प हे दाेन दिवसीय भारत भेटीवर आले आहेत. या भेटीत त्यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. त्याचबराेबर जगातील सर्वात माेठ्या क्रिकेट स्टेडियमवरुन त्यांनी भारतीयांना संबाेधित केले. संध्याकाळी त्यांनी ताजमहालला भेट दिली. या दाैऱ्यात त्यांच्या साेबत त्यांची पत्नी, मुलगी आणि जावई देखील आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष हाेण्यापूर्वी डाेनाल्ड ट्रम्प हे माेठे बांधकाम व्यावसायिक हाेते. जगभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांची बांधकामे आहेत. ट्रम्प आणि पुण्याचं देखील नातं आहे. याआधी देखील ट्रम्प भारतात येऊन गेले आहेत तेही पुण्यात. यावेळी त्यांनी पुण्यातील काही बांधकाम व्यवासायिकांशी चर्चा देखील केली हाेती. खूप कमी लाेकांना माहित असेल की पुण्यातील कल्याणीनगर भागात दाेन टाेलेजंग इमारती आहेत. या दाेन इमारती 'ट्रम्प टाॅवर' म्हणून ओळखल्या जातात. या इमारतीच्या उद्घाटनाच्या साेहळ्याला ट्रम्प यांचा मुलगा पुण्यात आला हाेता. त्याच्या उपस्थितीत या दाेन्ही इमारतींचे उद्घाटन झाले आहे.
तेवीस मजली या इमारतींमध्ये एका मजल्यावर केवळ एक फ्लॅट आहे. विशेष म्हणजे अभिनेता रणबीर कपूरचा फ्लॅट देखील या इमारतीमध्ये आहे. या इमारतीमध्ये ट्रम्प यांच्या दी ट्रम्प ऑर्गनायझेशनने गुंतवणूक केली नसल्याचे म्हंटले जाते. परंतु ट्रम्प यांच्यासाेबत झालेल्या करारात ट्रम्प यांचे नाव वापरण्याबाबत परवानगी मिळाली आहे. या करारातील इतर बाबी या गाेपनीय ठेवण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या जागेच्या संदर्भात देखील वाद आहे.