पुणे : बकरीईद निमित्त प्राण्यांची कुर्बानी न देता रक्तदान करण्याचा एक अनाेखा संदेश मुस्लिम सत्यशाेधक मंडळ अाणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून (अंनिस) देण्यात अाला. पुण्यातील राष्ट्रीय सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. गेल्या अाठ वर्षांपासून हा उपक्रम सुरु असून या माध्यमातून धार्मिक सण हे समाजाभिमुख अाणि मानवतावादी व्हावेत तसेच हमीद दलवाई अाणि डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांचा विज्ञानवादी विचार समाजात रुजावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुस्लिम सत्यशाेधक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमशुद्दीन तांबाेळी यांनी सांगितले.
अाज सकाळी राबविण्यात अालेल्या उपक्रमात 50 मुस्लिम बांधवांनी रक्तदान केले. हा उपक्रम केवळ पुण्यातच नव्हे तर राज्य पातळीवर मुस्लिम सत्यशाेधक मंडळ अाणि अंनिसकडून राबविण्यात येताे. केरळमध्ये अालेल्या पूराच्या पार्श्वभूमिवर यंदा बकरीईदला कुर्बानी न करता केरळच्या बांधवांना मदत करण्याचे अावाहन करण्यात अाले हाेते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे तांबाेळी यांनी सांगितले. केवळ अाजच्या दिवस नाही तर हा रक्तदानाचा सप्ताह राज्याच्या विविध ठिकाणी राबविण्यात येणार अाहे. त्याची सुरुवात अाज पुण्यात करण्यात अाली.
या उपक्रमाविषयी बाेलताना तांबाेळी म्हणाले, गेल्या अाठ वर्षांपासून बकरीईदच्या दिवशी रक्तदान शिबिराचे अायाेजन करण्यात येते. धार्मिक सण समाजाभिमुख व्हावेत तसेच दलवाई अाणि दाभाेलकरांचा विज्ञानवादी विचार समाजात रुजावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात अाला अाहे. समाजातील प्राण्यांच्या अाहुतीच्या परंपरेमध्ये अनेकदा बिभत्स वातावरण तयार केले जाते. यात पर्यावरण अाणि इतर गाेष्टींचा विचार केला जात नाही. माेठ्या प्राण्यांच्या अाहुतीमुळे अनेकदा वाद प्रतिवाद हाेतात. त्यामुळे सामाजिक वातावरण कलुषित हाेते. या रक्तदानाच्या उपक्रमामुळे एक समाजिक संवाद, साैहार्द निर्माण हाेण्यास मदत हाेते.
अंनिसचे राज्य कार्यसचिव मिलिंद देशमुख म्हणाले, मुस्लिम सत्यशाेधक मंडळाबराेबर डाॅ. दाभाेलकर असल्यापासून अंनिसही या उपक्रमामध्ये सहभागी हाेत अाहे. अनेकदा अंनिसवर मुस्लिम समाजातील अनिष्ठ प्रथांविराेधात अावाज उठवत नसल्याचा अाराेप हाेत असताे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राण्यांची कुर्बानी देण्याएेवजी रक्तदान करा असा संदेश अाम्ही मुस्लिम बांधवांना देत असताे.