तेजस टवलारकर-
पिंपरी : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. लग्नानंतर अमूक करू, तमूक करू असे मनोदय संकल्प करणारी जोडपी आपण पाहिली असतील. मात्र, लग्न जसा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्यासाठी आयुष्य अनमोल आहे. अवयवदान केल्याने कुणाला तरी दृष्टी मिळू शकते, कुणाला जीवनदान मिळू शकते, याचे भान ठेवून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी एका नवरदेवाने अवयदान करून नवा आदर्श घालून दिला आहे.
जन्म-मृत्यू हेच माणसाच्या आयुष्यातील अंतिम सत्य असले, तरी एखाद्याला जीवनदान देणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच डॉक्टरांना देव मानले जाते. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगाचे ठरते. कोणाचेतरी प्राण वाचविण्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे मरावे परी, अवयवदानरुपी उरावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत मोनीष कांबळे या तरुणाने लग्नाचे औचित्य साधून अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.
लग्नसोहळा म्हटलं की, जेवणावळी, बँडबाजा यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु, हा खर्च टाळून सामाजिक संदेश देत मोनीष नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अवयव उपलब्ध न झाल्याने देशात अनेकांना जीव गमवावा लागतो. अनेकांना अवयव मिळण्याची प्रतीक्षा असते. पंरतु अवयव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अवयवदान दिन साजरा करताना प्रत्यक्षात दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे, त्यातूनच हा निर्णय घेतला.
अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे अवयवदानासाठी समोर येणाऱ्यांची संख्या कमी आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही आपण जग बघू शकतो. अवयवदान केल्यास ते अवयव दुसऱ्यांसाठी उपयोगी येतात. अवयवदानामुळे मरणानंतरही आपण दुसऱ्यांच्या वनात आनंद भरू शकतो. यामुळे अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. अवयवदानासाठी जनजागृती करत राहणार आहे.- मोनीष कांबळे