----------
मंचर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. अशावेळी वन्यप्राण्यांना खाण्यासाठी काहीही मिळत नाही. त्यामुळे मंचर शहरातील युवकांनी पुढाकार घेत तीर्थक्षेत्र भीमाशंकर येथील मुक्या प्राण्यांना फळे देऊन त्यांची उपासमार टाळली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने लॉकडाऊन सुरू आहे. तीर्थक्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे भाविक, पर्यटक येणे बंद झाले आहे. बहुतांश वन्य प्राणी यांना भाविक पर्यटक यांनी दिलेल्या खाण्याच्या पदार्थांवर त्यांची गुजारण होण्याची सवय या प्राण्यांना लागली होती. मात्र आता पर्यटक बंदमुळे मंदिराजवळ असलेल्या परिसरातील माकड, हरिण आदी प्राण्यांची उपासमार होत होती. पाण्यासाठी व अन्नाच्या शोधासाठी भटकंती सुरू होती.
मंचर शहरातील काही युवकांचा लक्षात आली. त्यामुळे या युवकांनी प्राण्यांना १ हजार कलिंगड व २० कॅरेट केळी दिली आहेत. पर्यटक नसल्यामुळे वन्य प्राणी व पक्ष्यांनाही आता अन्न मिळत नसल्याने त्यांची देखील उपासमार होऊ लागली आहे. भीमाशंकर परिसरात असणाऱ्या अभयारण्यात अनेक माकड, वानर, हरण व अन्य वन्य प्राणी आहेत. कोणीही नागरिक उपाशी राहू नये यासाठी आपल्या घासातला एक घास वन्य प्राण्यांना देण्याचा प्रयत्न करत मंचर शहरातील युवकांनी आता पुढाकार घेतला असून वन्य प्राण्यांकरिता अन्न उपलब्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमामुळे तीर्थक्षेत्र भीमाशंकर परिसरातील प्राणी व पक्ष्यांना मोठा आधार मिळणार आहे. भीमाशंकर देवस्थानच्या परिसरात माकडांच्या टोळ्यांचा मोठा वावर असतो. त्यांच्याकरीत मुरमुरे, केळी, कलिंगड, बिस्किटे, फुटाणे असे खाद्य पदार्थ उपलब्ध केले जात आहेत.
यावेळी आकाश मोरडे, महेश घोडके, प्रशांत (भाऊ) मोरडे, जयेश भालेराव, शुभम गवळी, स्वप्निल लोखंडे, आदित्य चौगुले, रोहन जंगम इ. जणांचे सहकार्य लाभले. आगामी काळातही हा उपक्रम चालू ठेवणार असल्याचे आकाश मोरडे यांनी संगितले.