ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे धानवली गावात प्रचंड नुकसान झाले असून रस्ताच वाहून गेल्याने धानवली गावचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी तातडीने पाहणी करून नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने आपद्ग्रस्त गावांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ध्रुव प्रतिष्ठान संस्थेने व तलाठी मंडल अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन धानवली गावातील कुटुंबांना तातडीने किराणा साहित्याचे ४० किट वाटप केले होते.
यामध्ये गहू,ज्वारी, साबण, बिस्कीट, हळद, वेगवेगळ्या डाळी यांसारख्या उपयुक्त किराणा साहित्याचा समावेश होता. प्रचंड पावसामुळे रस्ता, नाले तुडुंब भरून वाहत असताना प्रशासनाच्या वतीने निगुडघर मंडल अधिकारी पांडुरंग लहारे, धानवली गावचे पोलीस पाटील महिपती धानवले, तलाठी नीलेश चव्हाण, ध्रुवचे राजीव केळकर, योगीराज केळकर यांनी अतिगरजेच्या वेळी मदत पोहोचवल्याबद्दल धानवली ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
धानवली गावातील लोकांना धान्याचे किट वाटप करताना धुव्र प्रतिष्ठान फोटो