पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुवर्णपदक पुरस्कारासाठी प्रा. डॉ. दिवाकर अभ्यंकर यांनी ३ लाख रुपयांची देणगी दिली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे हा धनादेश त्यांनी सुपूर्त केला.
जैव तंत्रज्ञान विषयातील २०२१-२२ दरम्यान उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात येणाऱ्या सुवर्णपदकासाठी ही मदत देण्यात आली. डॉ. अभ्यंकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सुवर्णपदक पुरस्कारासाठी यंदा सातव्यांदा आर्थिक मदत केली आहे. यापूर्वी ६ वेळा त्यांनी अर्थशास्त्र, व्यवस्थापन, फार्मा, विधी, भौतिकशास्त्र आणि संस्कृत या शाखांच्या सुवर्णपदकासाठी आर्थिक सहाय्य केले आहे.
डॉ. अभ्यंकर हे क्रेडाई महाराष्ट्र आणि पुण्याचे महासंचालक असून मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी महासंचालक आहेत. डॉ. अभ्यंकर म्हणाले, “मी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. शंतनुराव किर्लोस्कर अध्यासनाचे प्रमुख म्हणून ५ वर्षे काम केले आहे. त्यामुळे माझ्या विद्यापीठाचे मी काही देणे लागतो, ही माझी सामाजिक जबाबदारी आहे असे मला वाटते.”