----------------
पुणे : लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली, त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना बाप्पाच्या मूर्तीच्या किमतीचा भार हलका करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तीविषयी नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी धायरीमध्ये स्व. बबनराव मेणेरे प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल २१०० गणेशमूर्तीचे दान करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मूर्ती दान करून करण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ मणेरे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. धायरी परिसरात त्यांनी मूर्ती दान करण्यासाठी गणेशमूर्तींचे स्टॉल ठेवले असून, नागरिकांनी नावनोंदणी करून व ओळखपत्र दाखवून मूर्ती घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. या सर्व मूर्ती पेण येथून आणल्या असून, त्या शाडूच्या मातीच्या असल्याने घरच्या घरी त्यांचे विसर्जन करणे शक्य आहे. मूर्ती घेणाऱ्या भाविकांमधूनच लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना ५१ हजार किमतीची सुवर्णमुद्रा देण्यात येणार असल्याचेही मणेरे यांनी सांगितले.
गुरुवारी सकाळी सिंहगड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना मूर्तीचे वाटप करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर धायरी परिसरातील मणेरे प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात या मूर्तीचे दान करण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी केला.
--
फोटो ०९ पुणे सिंहगड पोलीस ठाणे गणेश मूर्ती
फोटो ओळी : पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले.