जेजुरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरणार आहे. येथील बंगाळी पटांगणावर बाजारासाठी काठेवाडी व गावठी जनावरे येऊ लागली आहेत. मात्र, येथे येणाऱ्या समाजबांधवांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बहुजन समाजाचे कुलदैवत असलेल्या खंडोबादेवाच्या नगरीत पौष पौर्णिमा यात्रा खऱ्या अर्थाने अठरापगड जाती-जमातींची यात्रा मानली जाते. या यात्रेसाठी वैदू, बेलदार, कुंभार, गाडीवडार, मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील लाखो लोक जेजुरीत येऊ लागले आहेत. या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे गाढव असल्याने यात्रेनिमित्त येथे गाढवांचा बाजार भरतो. उद्या गावठी व काठेवाडी गाढवांचा बाजार भरणार असून, परवा शुक्रवारी पौष पौर्णिमा सुरू होत असल्याने दोन दिवस जेजुरीगडावर मोठी गर्दी राहणार आहे. अशाच प्रकारचे बाजार मढी, सोनारी, माळेगाव (नांदेड) या ठिकाणी भरतात; परंतु जेजुरीचा बाजार सर्वांत मोठा मानला जातो. राज्यभरातून येथे गाढवांसह भाविक येऊ लागले आहेत. जेजुरीच्या वर्षाकाठी आठ मोठ्या यात्रांपैकी पौष पौर्णिमाची यात्रा असते. राज्यभरातील अठरापगड जाती-जमातींची यात्रा म्हणून ही यात्रा प्रचलित आहे. यात्रेनिमित्त भरणारा हा बाजार ही एक परंपरा आहे. ती परंपरा मोडीत निघू नये यासाठी पालिका व शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाविकांना सोयी-सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे, असे येथे गाढवे विक्री व खरेदीसाठी येणाºया व्यापाºयांनी सांगितले. चार वर्षांपासून बाजारात येणाºया जनावरांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ब्रूक हॉस्पिटल फॉर अॅनिमल इंडिया या केंद्रीय संस्थेच्या अश्वकल्याण प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील मेढा येथील श्रमिक जनता विकास संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी विनायक पाटील, शामराव कुलकर्णी, शिवाजी ओमासे, समन्वयक लहू तरडे येथे आलेले आहेत. त्यांनी ही येथील असुविधांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.......सुविधांचा अभावच्राज्यभरातून अठरापगड जाती-जमातीच्या भाविकांना गाढवांचा बाजार भरतो तेच बंगाली पटांगण उतरण्याचे ठिकाण आहे. पूर्वी हे पटांगण प्रशस्त होते. पारंपरिक गाढवांचा बाजारही मोठ्या प्रमाणावर भरत असे. आता मात्र या पटांगणावर शाळा, ग्रामीण रुग्णालय, सुलभ शौचालय इमारती उभी राहिल्याने जागा कमी पडू लागली आहे. या पारंपरिक बाजारासाठी प्रशस्त जागा असणे गरजेचे आहे. च्अपुरी जागा असूनही तेथे स्वच्छता, साफसफाई केलेली नाही. सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. शिवाय, पुरेशा उजेडाचीही येथे सोय नाही. येथे हायमस्ट लॅम्पची उभारणी केलेली आहे. मात्र तो बंद आहे. तात्पुरत्या हॅलोजनची व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याची सोयही योग्य पद्धतीने केलेली नाही. रस्त्यावर पाण्याचा टँकर उभा करून पाण्याची सोय करण्यात आली आहे.
पौष पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र जेजुरीत गाढवांचा बाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 1:31 PM
यात्रेसाठी वैदू, बेलदार, कुंभार, गाडीवडार, मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील लाखो लोक जेजुरीत
ठळक मुद्देजेजुरीच्या वर्षाकाठी आठ मोठ्या यात्रांपैकी पौष पौर्णिमाची यात्रा काठेवाडी आणि गावठी जनावरे झाली दाखल