पुणे : माझी जात काेणती हे विचारु नका मी छत्रपतींचा मावळा आहे असा टाेला अमाेल काेल्हे यांनी शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना लगावला आहे. अमाेल काेल्हे यांना मराठा नाही तर मावळा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याचे पाटील यांनी म्हंटले हाेते. काेल्हे हे शिरुरच्या दाैऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पाटील यांचा समाचार घेतला. गेली 15 वर्षे शिवनेरीचा शिलेदार आहे असं म्हणणाऱ्यांना छत्रपतींच स्मारक राष्ट्रीय स्मारक घाेषीत करता आले नाही असा आराेपही त्यांनी पाटील यांच्यावर केला.
काही दिवसांपूर्वीच अभिनेते अमाेल काेल्हे यांनी मुंबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. काेल्हे यांना शिरुर मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिरुरच्या दाैऱ्यावर असताना आपण शिवरायांचे मावळे असल्याचे ते म्हंटले. शिरुर मतदार संघात जन्म घेणारा प्रत्येकजण हा भाग्यवान आहे. असे ते यावेळी म्हणाले तसेच शिवाजी आणि संभाजी महाराज ही प्रेरणास्थाने या मतदार संघात आहेत. शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फाेटाे बॅनरवर लावू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.