लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “वर्षानुवर्षे एकच पद्धती अस्तित्वात होती. आता यात सातत्याने बदल होत आहेत. नवी शिक्षण पद्धती रुजवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. मात्र नवे आत्मसात करताना जुन्या पारंपरिक पद्धतींकडे दुर्लक्ष करता कामा नये. कृत्रिम बुद्धिमत्ता जीवनाचा अविभाज्य घटक बनली असली तरी त्याचे व्यसन लागता कामा नये,” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी व्यक्त केले.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्तावित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग’ शैक्षणिक अभ्यासक्रमात येऊ घातले आहे. या तंत्रज्ञानाविषयी बंगळुरूच्या फुटोलर्न एज्युकेशन संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात अँड. जैन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आर्किड स्कूलच्या संस्थापक संचालिका लक्ष्मी कुमार, एसएनबीपी स्कूलच्या प्राचार्या जयश्री वेंकटरमन, अलार्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका ज्योत्स्ना मिश्रा, एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या बिंदू सैनी, मिटकॉन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मोनिका छाब्रा चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या.
सायबर सुरक्षा, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर होणारा चांगला आणि वाईट परिणाम, शिक्षण क्षेत्रात आणि शिकवण्याच्या पद्धतीत होणारे बदल या विषयांवर यावेळी चर्चा झाली. हे तंत्रज्ञान शिकवण्यासोबतच ते वापरण्याची नैतिक जबाबदारीही विद्यार्थ्यांना कळायला हवी, असे मत शिक्षकांनी मांडले.
चर्चासत्राचे संचालन सेजल समर-जोधावत यांनी केले. त्या म्हणाल्या, “सर्व क्षेत्रांत वापर वाढल्याने आता शालेय अभ्यासक्रमातही कृत्रिम बुद्धिमत्ता आणली जात आहे. या तंत्रज्ञानाविषयी तरुणांना जागरूक करणे महत्त्वाचे आहे. सीबीएसईने याविषयीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. शालेय अभ्यासक्रमात याची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक आहे.”