वानवडी : बँकिंग परीक्षेसाठी कोल्हापूरहुन पुण्यात आलेल्या अंध मुलीला लेखनिकाने अडचण निर्माण झाल्याचे सांगून असमर्थता दर्शवली त्यामुळे द्विधा मनस्थितीत आलेल्या अंध मुलीच्या मदतीला लेखनिक म्हणून वानवडीतील मुलींनी मदत केली. अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातून कौतुक होत आहे.
पुण्यातील रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील टीसीएस आय आँन डिजीटल झोन, सहयोग डिजीटल हब या परिक्षा केंद्रावर कोल्हापूर मधील अंध मुलीची परीक्षा होती. परिक्षेसाठी लेखनिकाची अगोदर व्यवस्था केल्याने अंध मुलगी परिक्षेसाठी येण्यास निघाली. प्रवासात असताना लेखनिकास संपर्क केला असता लेखनिकाला अडचण निर्माण झाल्यामुळे येऊ शकत नसल्याचे समजले.
अंध मुलीची परीक्षा देण्याची इच्छा पुर्ण
हतबल झालेल्या अंध मुलीला काहीच सुचत नव्हते. अशा वेळी दोन वर्षापूर्वी अशाच एका अंध मुलीला मदत केलेल्या वानवडीतील सुकन्या वाळुंज हिला फोन करत लेखनिक मिळवून देण्याचे सांगितले. यावेळी लेखनिकास पात्र असणाऱ्या घराशेजारील मानसी बनकर हिस लेखनिक म्हणून मदत करण्यास विचारणा केली. बनकर हिने होकार दिल्यानंतर दोघींनी त्वरीत परिक्षा केंद्र गाठले व अंध मुलीची परीक्षा देण्याची इच्छा पुर्ण झाली.
दिव्यांगाना मदत करणाऱ्यांची कमतरता...
अंध, दिव्यांग परिक्षार्थींना उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी लिखान करणाऱ्या किंवा संगणकीय ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची मदत लागत असते. सोशल मिडिया वरील फेसबुक, वाट्सअप च्या मदतीने अशी मदत मिळणे काही प्रमाणात सोपे झाले असले तरी आजही काही दिव्यांग परिक्षार्थींना उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी लेखनिक किंवा संगणकाचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची कमतरता भासत आहे. मदत करण्यासाठी तयार झालेल्या व्यक्ती परिक्षा केंद्रावर येईपर्यंत हे दिव्यांग परिक्षार्थी सतत त्यांच्या संपर्कात रहात असतात. परंतु परीक्षेपूर्वी मदत करणाऱ्या व्यक्तींना अडचण निर्माण झाल्यास दिव्यांग परीक्षार्थींना ऐनवेळी लेखनिक न मिळाल्यास परीक्षेला मुकावे लागते.
तर परीक्षेला मुकावे लागते ''एका दिव्यांग मुलीच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास वानवडीतील सुकन्या वाळुंज व मानसी बनकर या दोन मुलींमुळे सुकर झाला. दिव्यांग तसेच अंधांसाठी लेखनिक मिळणे हे कठीण काम असते, त्यात अचानक आलेल्या अडचणीमुळे लेखनिक येऊ शकले नाहीत तर संभाव्य नोकरीला मुकावे लागत असल्याचे आशा कांबळी या कोल्हापूरच्या अंध परिक्षार्थीने सांगितले.''