Ajit Pawar: फाजीलपणा करू नका, जबाबदारीने वागा; अजितदादांनी बैठकीत कार्यकर्त्यांना सुनावले
By राजू इनामदार | Published: June 5, 2023 04:06 PM2023-06-05T16:06:19+5:302023-06-05T16:06:31+5:30
सर्वांना पदे दिली आहेत, पदं मिळाले की व्हिडिओ बनवायचा बंद करा, त्यातून पक्षाची बदनामी होते
पुणे: फाजीलपणा करू नका, पदे दिली आहेत, जबाबदारीने वागा, व्हिडिओ बनवत बसू नका. तुमच्यामुळे पक्षाची बदनामी होते अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सुनावले. लोकसभेत कसे काम करता ते पाहूनच विधानसभेची उमेदवारी निश्चित केली जाईल असे ते म्हणाले.
पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे नियोजन आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी मार्केट यार्ड परिसरातील एका कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार यांनी सातत्याने उमेदवारी व पदे याविषयी बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना बरेच झापले. पदं, पदं काय करता? सर्वांना पदे दिली आहेत. पदं मिळाले की व्हिडिओ बनवायचा बंद करा. त्यातून पक्षाची बदनामी होते, त्यामुळे जबाबदारी वागायला शिका असे पवार म्हणाले.
बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. त्यात त्यांनी वर्धापनदिनी पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम घेत असल्याची माहिती दिली. अहमदनगरला ९ जूनला सभा घेण्यात येणार आहे. या सभेची आसपासच्या लोकसभा मतदारसंघातून पदाधिकारी, कार्यकर्ते येणे अपेक्षित आहे. पुण्यातूनही आमचे बरेच लोक सभेला येतील. महाविकास आघाडीत मतविभागणी व्हायला नको अशी आमची भूमिका आहे. ज्याची ताकद जास्त तिथे त्याला जागा द्याव्यात. आम्ही आमचा आढावा घेतो आहोत. बाकीचे पक्ष त्यांचा आढावा घेतील. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन विचारविनिमय करावा अशी आमची भूमिका आहे असे पवार यांनी सांगितले.
आमच्यावर टीका करायची असेल तर तो विरोधकांचा, ते आता सत्तेत आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. मात्र महिलांना राजकारणात आरक्षण यासारखे निर्णय कोणी घेतले हे सर्वांना माहिती आहे. पवार साहेब निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीही वागलेले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबतही आम्ही तसेच काही करतो आहोत या टिकेला अर्थ नाही असे पवार म्हणाले.