अकरा गावांसारखी वागणूक नको कोंढवे धावडे वासियांची भावना
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेत चार वर्षापुर्वी ज्या अकरा गावांचा समावेश झाला त्या गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही, पायाभूत सुविधांची अजूनही वानवा आहे. आमच्यावर तशी परिस्थिती येऊ नये, अशी भूमिका कोंढवे-धावडेकरांनी मांडली.
आमच्या गावात राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आहे. याचा फायदा गावातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये व्हायला हवा पण तसे होत नसल्याने गावातील तरूण बेरोजगार झाले आहेत. आमच्या पिढीला खेळण्यासाठी जागा असायची पण आताच्या पिढीला खेळण्यासाठी क्रिडांगण नाही हा त्यांच्यावर अन्याय असल्याची तक्रार गावातील जेष्ठ नागरिकांनी केली.
कोंढवे-धावडेतील मांसविक्रेते संध्याकाळी त्यांचा दिवसभरातील साठलेला कचरा उघड्या जागेवर टाकतात. त्यामुळे दुर्गंधी तर पसरतेच पण यातून मोकाट कुत्र्यांची मोठी संख्या वाढली असून त्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. मागील काही दिवसांत ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्यांवर कुत्र्यांचे जिवघेणे हल्ले झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. महानगरपालिकेने कुत्र्यांना आळा घालणारी मोहीम तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
गावातील विद्यार्थ्यांना पुणे शहरात न जावे लागता गावाजवळच महाविद्यालयाची सोय व्हावी. गावात जलतरण तलाव नसल्याने त्यासाठी तरतूद करावी. शहर बस वाहतुकीसाठी बसस्थानक नसल्याने पीएमपी बसगाड्या रस्त्यावर कुठेही उभ्या केल्या जातात त्यामुळे अपघातांची शक्यता असते. प्रशासनाने बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. आमच्या गावाचा पुणे महापालिकेत १९९७ साली समावेश झाला होता पण २००१ ला पुन्हा गावाला वगळण्यात आले. आता समावेश होणार असेल तर गावात विकासाभिमुख प्रकल्प राबवले जावेत, अशा गावकऱ्यांच्या मागण्या आहेत.
कोट
विलिनीकरणानंतर आमची पाणीपट्टी कमी होईल मात्र घरपट्टी वाढेल. त्यामुळे महापालिकेने सुवर्णमध्य साधत दिलासा द्यावा.
- संदीप खराडे, नोकरदार
कोट
महापालिकेने गावाच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करून द्यावा. -राजू राठोड, उपसरपंच.
फोटो ओळ - मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून त्या कामाचे दगड आणि लोखंडी गज तसेच रस्त्याच्या कडेला टाकून दिलेले आहे. याने वाहतुकीचा खोळंबा तसेच अपघाताची शक्यता वाढते.