कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 9, 2024 09:07 AM2024-04-09T09:07:17+5:302024-04-09T09:08:01+5:30
मावळामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिल्या...
पिंपरी : महाविकास आघाडीचे उमेदवार सांगतात, 'दादांनीच मला इकडे पाठवले आहे', पण ते साफ खोटे आहे. दादांनी कोणाला कोठेही पाठवलेले नाही. असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. हलक्या कानाचे राहू नका. कितीही मैत्री अथवा नाते असले तरी निवडणुकीच्या काळात तरी विरोधी पक्षातील उमेदवाराला भेटू नका. ही गावकी-भावकीची निवडणूक नाही. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. मावळामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिल्या.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्षांची संयुक्त बैठक काळेवाडी येथे झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. बैठकीस भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पुनर्वसन व मदत खात्याचे मंत्री अनिल पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, सुनील शेळके, क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर तसेच अमित गोरखे, बापूसाहेब भेगडे, रवींद्र भेगडे, गणेश खांडगे, भाऊ गुंड, निलेश तरस, राजेंद्र तरस आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यघटनेत करण्यात आलेल्या दुरुस्त्या या देशहितासाठीच करण्यात आल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी यांना तीन चतुर्थांश बहुमताची म्हणजेच ४०० खासदारांची आवश्यकता आहे. त्यांना ती ताकद देण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे. त्यासाठी नाराजी, रुसवे-फुगवे, मान-अपमान सर्व बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहनही चंद्रकात पाटील यांनी केले.
प्रत्येक मतदारसंघात मोदी हेच उमेदवार : उदय सामंत
महायुती विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे. स्थानिक पातळीवरील उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार कोणीही करू नये. प्रत्येक मतदारसंघात मोदी, शिंदे, फडणवीस व पवार हेच उमेदवार आहेत, असे समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.