पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, परीक्षांसंदर्भात समाजमाध्यमावर काही चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून अफवा पसरविल्या जात आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेबाबत होणाऱ्या बदलांची माहिती वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. तसेच परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य मंडळातर्फे इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १२ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत, तर बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार व मंजूर आराखड्यानुसारच होतील. त्यामुळे परीक्षेशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांनी कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये.
-----
राज्य मंडळाच्या सचिवांचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.