Ajit Pawar Baramati Speech ( Marathi News ) :बारामतीत पार पडलेल्या जनसन्मान मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत जनतेनं विकासाला साथ द्यायला हवी, असं आवाहन केलं आहे. "निवडणूक काळात काही हवसे गवसे नवसे येतील, पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजित पवार शब्दाचा पक्का आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो," असं म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या योजनांची माहिती उपस्थित जनसमुदयासमोर ठेवली.
अजित पवार यांनी आज बारामतीत आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. भर पावसात केलेल्या या भाषणात अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देत आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या अजेंड्याला बळी पडू नका, अशी साद बारामतीकरांना घातली. "लोकसभा निवडणुकीत आम्ही संविधान बदलणार, असा खोटा प्रचार विरोधकांनी केला. मात्र जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकणार नाही. आम्ही या संविधानानुसारच काम करत आहोत. आम्ही शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मनात ठेवूनच काम करत आहोत," अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.
"योजना सुरू ठेवायच्या असतील तर पुन्हा महायुतीचं सरकार हवं"
बारामतीतील सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी सुरू असलेल्या योजनांचा पाढा वाचला. "माझ्या बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील माताभगिणींसाठी आपण लाडकी बहीण योजना आणली आहे. तसंच तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठीही हे सरकार चांगलं काम करत आहे. मात्र या योजना सुरू ठेवायच्या असतील तर पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आणावं लागेल," असं आवाहन अजित पवारांनी केलं.
बारामतीत युगेंद्र पवार आव्हान देणार? लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान मोडून काढत सुळे यांनी तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय मिळवला. बारामतीत उमेदवार कोणीही असले तरी मुख्य सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होता. प्रतिष्ठेच्या या सामन्यात शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना आस्मान दाखवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांना चितपट करण्यासाठी शरद पवारांकडून प्रयत्न सुरू झाल्याचं दिसत आहे. बारामती लोकसभेनंतर बारामती विधानसभा निवडणुकीची आतापासूनच चर्चा रंगली आहे. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे युगेंद्र पवार यांना घेऊन आतापासूनच मैदानात उतरले आहेत. पवारांनी संपूर्ण तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र हेच मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.