पुणे : ‘शैक्षणिक संकुल ज्ञानदानाचे काम करतात, त्यामुळे शिक्षण संस्थामध्ये नव्या कल्पना मांडून प्रयोग झाले पाहिजेत. देशातील कोणत्याही राज्यातील शिक्षणक्षेत्र अथवा विद्यापीठांमध्ये धर्मा-धर्माचे, जातींचे विष पेरू नका. वाद निर्माण करू नका,’ असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोधी पक्षांना केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी छगन भुजबळ बोलत होते. कर्नाटक राज्यात मुस्लिम मुलींनी हिजाब घालू नये. यावरून वाद झाला असून, त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांना भुजबळ यांनी आवाहन केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावर जगातील विविध भाषेत पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर लहान पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. या वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.’
मूर्तिकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखित ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणि साडेतेरा फुटांचा आहे.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. त्यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणि तत्त्वचिंतक होत्या. विधवा महिलांची बाळंतपणं त्यांनी केली होती. लिंग समानता चळवळीचा सावित्रीबाई या आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा.
- डॉ. नीलम गोऱ्हे, सभापती, विधान परिषद
समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमात्र साधन आहे, हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श निर्माण केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर यावा, यासाठीच विद्यापीठ परिसरात पुतळा उभारण्यात आला आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ