कॅन्टोन्मेंट व महापालिका हद्दीवरील गंगा सॅटेलाईट व भैरोबा मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून हद्दीवर असलेल्या भागात स्वच्छता केली.
गंगा सॅटेलाईट येथील कॅन्टोन्मेंट हद्दीत नाल्यालगतची स्वच्छता करत असताना येथे गस्त घालत असलेल्या फौजींनी सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक यांना, 'हमारे यहा कुछ मत करो, 'हम हमारा कर लेंगे, आप यहा से जावो' अशा शब्दांत बोलून स्वच्छता करण्यास नकार दिला, असे आरोग्य निरीक्षक प्रदीपकुमार राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू असल्याने वानवडीतील कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेला कचरा साफ करण्यासंदर्भात वानवडी रामटेकडी सहा. आयुक्त किशोरी शिंदे यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. तरीही त्यांच्याकडून स्वच्छता होत नसल्याचे दिसत असल्याने महापालिका कर्मचारी स्वच्छता करण्यास पुढे सरसावले, परंतु फौजींनी त्यांना अडवले, ही बाब दुर्दैवी असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
फोटो : स्वच्छता करण्यात आलेला गंगा सॅटेलाईट येथील भाग.