पुणे : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डीएड अभ्यासक्रम बंद करण्यात आल्या असून, राज्य शासनाने स्वत:हून राज्यातील सर्व डीएड कॉलेज बंद करण्याचा निर्णय घ्यायला हवा. तसेच त्यावर होणारा खर्च ऑनलाइन शिक्षणासाठी करण्याबाबत विचार करावा. त्यातच गेल्या काही वर्षांपासून डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
राज्यातील शाळांमधील अनेक शिक्षक अतिरिक्त झाले तसेच शासनाने शिक्षक भरतीवर बंदी आणली. परिणामी हजारो डीएड पदवीधारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळेच सध्या राबविल्या जात असलेल्या डीएड प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यातच नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सध्या इयत्ता बारावीनंतर पाच वर्षांचा बीएड अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डी.एड. प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाली आहे. राज्य मागील वर्षी ३२ हजार जागांवर केवळ ४० टक्के म्हणजे १४ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला होता. त्यामुळे दिवसेंदिवस डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली असून यंदा त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यंदा प्रवेशाच्या पहिल्या फेरीतून ३ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
डीएड प्रवेशाची दुसरी फेरी सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. तसेच प्रवेशाची तिसरी फेरी १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात १ हजार ८६० जागांसाठी केवळ ५२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ३०० जागा रिक्त राहणार आहेत.
--------------------------------------
पुण्यातील डीएड प्रवेशाची आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण कॉलेज : २७
एकूण प्रवेश क्षमता : १ हजार ८६०
प्रवेशासाठी प्राप्त झालेले एकूण अर्ज : ५२८
शासकीय कॉलेजमधील प्रवेश १५३
खासगी कॉलेजमधील प्रवेश : १०३
पहिल्या फेरीतून झालेले एकूण प्रवेश २५६
-----------------------------------------
नवीन शैक्षणिक धोरणात डीएड अभ्यासक्रमाचा समावेश नसून तो रद्द केला आहे. त्याऐवजी बारावीनंतरच्या पाच वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे.त्यामुळे शासनाने स्वत:हून डीएड कॉलेज बंद करायला हवीत. तसेच या कॉलेजवर होणारा खर्च बंद करून ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणावर होणाऱ्या खर्चासाठी करण्याचा पर्याय स्वीकारावा.
- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
---------------------------------
शिक्षकांचे वेतनही तुटपुंजे
शासनाने गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरती केली नाही. त्यातच डीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर टीईटी परीक्षा द्यावी लागते. त्यानंतरही नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. शिक्षकांना मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. त्यामुळे शिक्षकाची नोकरी नकोरे बाबा म्हणत विद्यार्थी डीएड अभ्यासक्रमाऐवजी इतर अभ्यासक्रमांचा विचार करत आहेत.