राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना 'कानमंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:50 PM2021-01-29T12:50:07+5:302021-01-29T13:10:11+5:30
जनतेचा पाठिंबा असेपर्यंत आम्ही इथे खुर्चीवर बसणार..पण ज्यादिवशी जनता पाठिंबा काढेल त्यादिवशी आम्ही घरी बसलो म्हणून समजा.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जसे रोखठोक वक्तव्य व शिस्तप्रिय स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ते प्रशासकीय यंत्रणेवर वचक ठेवण्यात हातखंडा असलेले मंत्री म्हणून देखील परिचित आहे.पण त्यांची एक आगळी वेगळी ओळख म्हणजे राजकीय सभांमधील भाषणे किंवा प्रशासकीय बैठका यांच्यात ते जुने किस्से ग्रामीण शैलीत रंगवून सांगतात तेव्हा उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकल्याशिवाय राहत नाही. आज देखील पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी तरुणांना ''राजकारणात यायच्या भानगडीत पडू नका,आता मी आलोय, इथेच अडकून पडलोय असा अजब गजब कानमंत्र देताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हास्याचे कारंजे फुटले.
पुणेजिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत यशस्वी जीवनाचा 'कानमंत्र' ही दिला. पवार म्हणाले, चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा. विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात. कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे,कुटुंबाचे, गावाचे नाव उज्ज्वल करा.
पवार पुढे म्हणाले, रणजित डिसले या शिक्षकाची दखल संपूर्ण जगाने घेतली. आणि ते जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.त्यामुळे जिथे जाल तिथे उत्तम काम करा. आपल्या शहराचे, परिसराचे नाव उज्वल करा. तसेच जनतेचा पाठिंबा असेपर्यंत आम्ही इथे खुर्चीवर बसणार ज्या दिवशी जनता पाठिंबा काढेल त्याच दिवशी आम्ही घरी बसलो म्हणून समजा. पण प्रशासकीय अधिकारी(zp च्या CEO यांना उद्देशून) पदावर रुजू झाल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कालावधी वाया गेला, मात्र ऑनलाईनमुळे आपण ते नुकसान काही प्रमाणात भरून काढले आहे. त्याचप्रमाणे अद्यापही कोरोना अजून संपलेला नाही प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे.आता बोलत असताना माझे उच्चर तुम्हाला कळावे म्हणून मी मास्क काढलाय नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्हीच मास्क नाही घातला आम्हाला काय सांगता?
आमच्यातील पुढारी बघा पोटं वाढलेले आहेत, सगळ्यांनी फिट रहायला हवे, व्यायाम करा, योगा करा, जे जे शरीरासाठी चांगले आहे ते ते करा, असाही सल्ला पवार यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.